‘राधा प्रेम रंगी रंगली’ तसचं ‘आई माझी काळू बाई’ अशा या मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री वीणी जगतापने ‘बिग बॉस मराठी’ या शोमधूनही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. वीणा सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. नुकतीच वीणाची बहीण लग्नबंधनात अडकली आहे. या लग्नसोहळ्यातील मेहंदी सोहळा, हळदी समारंभ तसंच लग्नविधींचे विविध फोटो वीणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
बहिणीच्या लग्नासाठी वीणाने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. या लेहग्यांनीतील काही सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र एका नेटकऱ्यांने वीणाच्या या फोटोंवर काही अश्लील कमेंट केल्या आहेत. या नेटकऱ्याने वीणाला डायरेक्ट मेसेज करत अश्लील कमेंट केल्या आहेत. मात्र वीणाच्या फोटोवर अश्लील कमेंट करणं या तरुणाला महागात पडलं आहे. वीणाचा ‘बिग बॉस’मधील जवळचा मित्र शिव ठाकरे तसचं काही परिचितांच्या मदतीने वीणाने या तरुणाचा शोध घेतला आहे. या तरुणाला अद्दल घडवण्यात आली आहे. वीणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिलीय.
हे देखील वाचा: शमिता शेट्टी नव्हे तर ‘ही’ आहे ‘बिग बॉस ओटीटी’ची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक
वीणाने एक स्क्रीनशॉट शेअर केलाय. यात या तरुणाने वीणाच्या फोटोवर अश्लील कमेंट केल्या आहेत. या कमेंट अत्यंत्य अश्लील असल्याने त्या लपवण्यात आल्या आहेत. अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाचा फोटोदेखील तिने शेअर केलाय. या फोटोवर तिने एक ताकिद दिलीय. “मुलींवर कोणतीही कमेंट कराल आणि त्याची दखल घेतली जाणार नाही हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अवघ्या एका तासात सगळी माहिती मिळवली म्हणजे विचार करा. परत असं काही झाल्यास त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील. असं वाईट कृत्य करण्यापेक्षा भरपूर शिकून आई बाबांच नाव मोठं कर.” असं तिने म्हंटलंय. सोबतच वीणाने या तरुणाने माफी मागितल्याचा व्हिडीओ देखील शेअर केलाय.
या फोटोंसोबत कॅप्शनमधून वीणाने अनेकांचे आभार मानत ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. “मित्रांनो थोडी सभ्यता दाखवा. याकडे दूर्लक्ष केलं जाईल असं समजू नका. या नेटकऱ्याने माझा रेटही विचारला होता. त्याने मेसेज डिलीट केल्याने मी स्क्रीनशॉट काढू शकले नाही. कुणाला ट्रोल करणं किंवा शिवीगाळ करणं केवळ बेकायदेशीर नाही तर एखाद्याला त्याचा मानसिक त्रासही होवू शकतो ज्यामुळे एखादी व्यक्ती स्वत:ला हानी पोहचवू शकते. इथून पुढे कुणालाही सोडणार नाही. ” असं म्हणत वीणाने ट्रोल करणाऱ्यांना बजावलंय.
तसचं वीणाने शिव ठाकरेसह तिला मदत करणाऱ्या इन्स्टा फॅन्सचे देखील आभार मानले आहेत. या तरुणाला पकडून शिक्षा करण्यात आली असल्याची माहिती तिने पोस्टमध्ये दिली आहे.