सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ शो चांगलाच चर्चेत आहे. स्पर्धकांमधील वाद असो किंवा ड्रामा यामुळे शोची प्रेक्षकांमध्ये चर्चा पाहायला मिळतेय. या सोबतच या शोचा होस्ट करण जोहरच्या होस्टिंगवर देखील काही प्रेक्षकांनी टीका केली आहे. आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या जुन्या पर्वातली स्पर्धक सोफिया हयातने करण जोहरवर टीका केली आहे. सोफिया ‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वात सामील झाली होती.

सोफिया हयातने ‘बिग बॉस ओटीटी’चा होस्ट करणची सलमान खानसोबत तुलना करत करणवर निशाणा साधला आहे. करण जोहरच्या होस्टिंगवर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सोफियाने देखील टीका केलीय. सोफिया म्हणाली, “करण सलमान खानपेक्षाही वाईट होस्ट आहे. तो हिंसा आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देतो. जर हा शो यूकेमध्ये सुरु असता तर बंद करण्यात आला असता. कारण यात हिंसेचं समर्थन केलं जातंय. करण चांगली टीआरपी मिळण्यासाठी लोकांचा अपमान करतो. हा बिग बॉसचा जुना फॉर्म्युला आहे.” असं सोफिया म्हणाली.

सोफिया एक अभिनेत्री असून तिने अनेक गाण्यामध्ये काम केलंय. मात्र सध्या ती अध्यात्माच्या वाटेवर आहे. पुढे सोफिया म्हणाली, “भारत ही एक अध्यात्मिक भूमि आहे जिथे धर्म कुणाचंही नुकसान करत नाही. मात्र करण जोहर आणि बिग बॉसचा शो या धर्माविरुद्ध जात आहेत. ते या देवभूमिला अपमानित करत आहेत. लोकांच्या असाह्यतेवर हसत आहेत. अशा शोमध्ये मी पुन्हा कधीच जाणार नाही.” असं म्हणत या शोबद्दल विचार करायला हवा असं ती म्हणाली.