Bobby Deol on outshining Ranbir Kapoor in Animal : २०२३ मध्ये रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या जोडीला चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट वडील-मुलाच्या कथेवर केंद्रित होता, ज्यामध्ये अनिल कपूरने वडिलांची भूमिका केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला.
बॉबी देओलने चित्रपटात १५ मिनिटांचा कॅमिओ केला होता. त्याच्या भूमिकेचे नाव अबरार हक होते. बॉबी देओलची भूमिका बोलू न शकणाऱ्या माणसाची होती. पण, त्याची उपस्थिती इतकी शक्तिशाली होती की त्याच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा झाली. बॉबीचे चाहते म्हणू लागले की त्याने रणबीरला मागे टाकले.
बॉबी देओलने रणबीरचे कौतुक केले
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलला विचारण्यात आलं की, त्यानं चित्रपटात रणबीर कपूरच्या भूमिकेलाही मागे टाकलं असं वाटतं का? प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, “असं अजिबात नाही… जर रणबीरला संपूर्ण तीन तासांचा चित्रपट सांभाळायचा असेल तर माझ्याकडे फक्त १५ मिनिटं होती. ३ तास रणबीर कपूरने मेहनत केली आहे. जर रणबीर ते ३ तास सांभाळू शकला नसता, तर माझी १५ मिनिटं व्यर्थ होती.”
रणबीरचे पुढे कौतुक करताना तो म्हणाला, “अॅनिमल चित्रपटातील हे पात्र रणबीरने खूप चांगल्या पद्धतीने साकारले आहे. जर रणबीरने ते योग्यरित्या केले नसते तर माझ्या प्रवेशाला फारसे महत्त्व आले नसते. अॅक्शन चित्रपटातील नाटक तेव्हाच काम करते, जेव्हा नायक आणि खलनायक दोघेही मजबूत असतात. दोघांनाही चांगले काम करावे लागते. असे नसावे की तुम्हाला सुरुवातीपासूनच माहीत असेल की कोण जिंकणार आहे, मग ते मजेदार नाही.”
‘अॅनिमल पार्क २’ कधी प्रदर्शित होईल?
‘अॅनिमल’च्या यशानंतर निर्माते चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत. ‘अॅनिमल’च्या प्रदर्शनाबाबत रणबीर म्हणाला होता की, “अॅनिमल पार्क’चे चित्रीकरण २०२७ मध्ये सुरू व्हायला हवे. संदीप आणि मी या चित्रपटाची कल्पना, पात्रे आणि संगीत यावर चर्चा केली आहे. सेटवर येण्यासाठी मी उत्सुक आहे.”
बॉबी देओलने १९९५ साली ‘बरसात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बॉबी देओल नुकताच आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमध्ये दिसला. त्याच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.