Bobby Deol Younger Son Left Studies : बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल सध्या आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये त्याने अजय तलवारची भूमिका साकारली आहे.

बॉबी देओलने अलीकडेच त्याची मुले आर्यमन देओल व धरम देओल यांच्याबद्दल उघडपणे सांगितले. अभिनेत्याने त्यांच्या शिक्षण आणि करिअरबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी आयुष्यात खूप वेगळे मार्ग कसे निवडले हे त्याने सांगितले.

‘रेडिओ नशा’शी झालेल्या संभाषणात बॉबी देओलने खुलासा केला की, त्याला त्याच्या दोन्ही मुलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करावे, अशी त्याची इच्छा होती. बॉबी म्हणाला, “मला माझ्या मुलांनी शिक्षण घ्यावे, असं वाटत होतं. माझ्या धाकट्या मुलानं बारावीनंतर शिक्षण सोडलं; पण माझ्या मोठ्या मुलाची त्यानं अर्ज केलेल्या प्रत्येक कॉलेजमध्ये निवड झाली. त्याला एनवाययू स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्रवेश मिळाला. मला कॉलेजबद्दल माहिती नव्हती, पण जेव्हा मी लोकांना सांगितलं की माझा मुलगा तिथे शिकत आहे, तेव्हा ते म्हणाले की, ते किती छान कॉलेज आहे. मी विचार केला, ‘बरं, मला याबद्दल माहिती नाही.’

आधीच्या एका मुलाखतीत बॉबी देओलने सांगितले होते की, त्याच्यासारखीच त्याची मुलेही चित्रपट उद्योगात येऊ शकतात; पण ती अजूनही लहान आहेत. भविष्यात, ते दोघेही या व्यवसायात सामील होऊ शकतात. त्याचा धाकटा मुलगा धरमला व्हिडीओ एडिटिंग, शूटिंग व फोटोग्राफीमध्ये रस आहे. त्याला एखाद्या दृश्याची पार्श्वभूमी आणि तांत्रिक बाबी समजतात. म्हणूनच आर्यमन आणि धरम भविष्यात चित्रपटांमध्ये काम करताना दिसू शकतात.

बॉबीने असेही सांगितले केले की त्याचा मोठा मुलगा आर्यमन देओल यानं आधीच इंडस्ट्रीचं लक्ष वेधलं आहे. त्याला चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. सध्या त्याला अभिनयात येण्याची घाई नाही. “तो काम करीत आहे आणि प्रशिक्षण घेत आहे. खूप ऑफर येत आहेत. मला वाटतं की, त्यानं प्रथम कला समजून घ्यावी आणि नंतर त्याचं पहिलं पाऊल उचलावं,” असं बॉबी म्हणाला.

‘अ‍ॅनिमल’मधील खलनायकी भूमिकेनंतर बॉबी देओलच्या कारकिर्दीला वेग आला आहे. तो पुढे अनुराग कश्यपच्या ‘बंदर’, आलिया भट्टच्या ‘अल्फा’ व तमीळ चित्रपट ‘जाना नायकन’मध्ये दिसणार आहे.