संजय दत्त हा ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त आणि सुंदर अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा मुलगा आहे. त्याच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्याने चित्रपटसृष्टीत अभिनय करण्यास सुरुवात केली आणि स्टारडम मिळवले. परंतु, त्याने त्याच्या व्यावसायिक जीवनात कितीही प्रगती केली तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या पालकांच्या शिकवणी अजूनही त्याच्या हृदयात आहेत.

संजय दत्तची आई नर्गिस आणि वडील सुनील दत्त आता या जगात नाहीत; परंतु अभिनेता अनेकदा त्याच्या पालकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करतो. या महिन्यात त्याच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त, संजयने एक पोस्ट शेअर केली होती. म्हणाला होता की, मला तुझी खूप आठवण येते. आता त्याने त्याच्या वडिलांसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

रविवारी संजय दत्तने त्याचे वडील सुनील यांची आठवण काढली. त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने अनेक संस्मरणीय फोटोदेखील शेअर केले. एका फोटोमध्ये लहान संजय त्याच्या वडिलांबरोबर पोज देत आहे. दोघांचा एक फोटो मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाचा आहे. इतर दोन फोटोंमध्ये सुनील दत्त एकटे आहेत.

हे फोटो शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्ही मला फक्त वाढवले ​​नाही, तर जीवन कठीण असताना कसे खंबीरपणे उभे राहायचे ते शिकवले. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाबा आणि दररोज तुमची आठवण येते.”

संजय दत्तच्या कामाची सुरुवात

संजय दत्तने १९८१ मध्ये ‘रॉकी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘रॉकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्या वर्षात तो सर्वांत जास्त कमाई करणारा १० वा चित्रपट होता. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, त्याची आई नर्गिस दत्त यांचे त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या फक्त तीन दिवस आधी निधन झाले. नर्गिस यांनी ३ मे १९८१ रोजी अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ ६ मे १९८१ रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या चित्रपटाद्वारे यशोमार्गावर पुढे वाटचाल करणाऱ्या संजयने सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले. तो शेवटचा ‘द भूतनी’ या चित्रपटात दिसला होता.