आता असा एखादा कॉमेडियन चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दोन गोष्टी स्पष्ट असतात. एक म्हणजे तो त्या चित्रपटाचा ‘नायक’ असतो व दुसरे म्हणजे तो अनेक स्टार्सना पाहुण्या भूमिकेत दाखवतोच. मेहमूदचा ‘कुँवारा बाप’, असरानीचा ‘चला मुरारी हीरो बनने’ ही उदाहरणे पुरेशी आहेत. जगदीप मुळचा भोपाळचा म्हणून त्याने ‘सूरमा भोपाली’ (१९८८) या चित्रपटाची निर्मिती केली. त्याचे शक्य तेवढे भोपाळलाच चित्रीकरण केले. तर धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, रेखा या प्रत्येकाच्या तारखेनुसार मुंबईत केले. ते त्याने अधिकाधिक प्रमाणात केल्याचे चित्रपटात जाणवते.
दादा कोंडकेंचीही तारीख हवी होती. दादा त्या दिवसात पुणे वा कोल्हापूरला आपल्या मराठी अथवा हिंदी चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी. अधेमधे मुंबईत आपल्या चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगला वा एखाद्या इव्हेंटला येत. जगदीप बिचारा दादांची तारीख मिळेल या आशेवर असे. एकाच चित्रपटात दोन कॉमेडियन एकत्र येणार म्हणजे धमाल वाढणार, दादांच्या हुकमी क्राऊडचाही लाभ होणार असे गणित स्पष्ट होते. अशी व्यावसायिक खेळी चुकीचीही नसतेच. ते जमवणे, जुळवणे खूपच अवघड वाटताच अखेर काय बरे ठरले? तर दादांनी ‘सूरमा भोपाली’च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला हजर राहून खूप खूप शुभेच्छा द्याव्यात.
दादांनी हे फारच आनंदाने केले. दादा कुठेही गेले तरी गप्प बसणाऱ्यातील नव्हतेच. सर्वप्रथम एखादा छान विनोद करीत वातावरण हलके करणार. मग अनेकांची विचारपूस करणार. दादांचा संगीताचा कान खूपच चांगला असल्याने त्यांनी हे गाणे समजून घेऊन छोटीशी प्रतिक्रिया देखील दिली. जगदीपसाठी हे सगळेच आनंददायक होते. तीच त्याची भावना या फोटोत दिसतेय.
दिलीप ठाकूर