Gowardhan Asrani Death News : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झालं आहे. गोवर्धन असरानी असं त्यांचं नाव होतं. मात्र त्यांना प्रेक्षक असरानी म्हणूनच ओळखत. विविध चित्रपटांमध्ये असरानी यांनी भूमिका साकारल्या. ‘अभिमान’ या चित्रपटातली भूमिका, ‘छोटीसी बात’ चित्रपटातली भूमिका तसंच ‘शोले’तला जेलर या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. शोले चित्रपटातील त्यांची जेलरची भूमिका विनोदी ढंगाची होती. जेलरची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आपल्या अभिनयाचे रंग विविध भूमिकांमध्ये भरणारा हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईतल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. असरानी यांच्या निधनाने विनोदी भूमिका साकारणाऱ्या एक हरहुन्नरी कलाकाराला हिंदी चित्रपटसृष्टी मुकली आहे. असरानी यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या विविध ढंगी भूमिका साकारल्या आहेत. ANI या वृत्तसंस्थेने त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.
प्रदीर्घ काळापासून आजारी होते असरानी
ज्येष्ठ अभिनेते असरानी हे गेल्या काही काळापासून आजारी होते. असरानी हे दीर्घ काळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते. असरानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. असरानी यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी सांगितलं की दीर्घकाळापासून असरानी आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांचं निधन झालं असं बाबुभाई यांनी सांगितलं. असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. असरानी यांचा जन्म १ जानेवाररी १९४१ ला झाला होता.जयपूरच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. हरे कांच की चुडिया या चित्रपटांतून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.
शोलेमधला जेलर ठरला अजरामर
शोले सिनेमातली जेलरची भूमिका अजरामर ठरली. कारण या भूमिकेवर हिटलरची छाप होती. विनोदी ढंगाची ही भूमिका लोकांच्या पसंतीस पडली. त्याचं चालणं, त्याची खास स्टाईल यामुळे त्या भूमिकेची चर्चा झाली. चित्रपटातले जय, विरु, ठाकूर, बसंती हे जसे गाजले तशीच असरानी यांनी साकारलेली जेलरची भूमिकाही स्मरणात राहिली.
असरानी यांच्यासाठी चित्रपट सृष्टीचा प्रवास सोपा नव्हता
असरानी यांनी राजस्थानच्या महाविद्यालयातून पदवी घेतली होती. शिक्षण संपल्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. २००४ मध्ये असरानी यांनी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक नेत्यांचा प्रचार केला होता. असरानी यांच्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीत येणं सोपं नव्हतं. गुड्डी या चित्रपटातली त्यांची भूमिका गाजली. असरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला व्यावसायिक अभिनेता सुरुवातीला कुणी मानायला तयारच नव्हतं. गुलजार एकदा मला म्हणाले होते की तू व्यावसायिक अभिनेता नाही तुझा चेहरा विचित्र आहे. मात्र माझा अभिनय पाहून त्यांनी कौतुकही केलं होतं अशी आठवण असरानी यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.