Attack on Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान त्याच्या घरी असताना त्याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला. त्या व्यक्तीने सैफच्या घरी काम करणाऱ्या गृहसेविकेसह वाद घातला. त्यानंतर सैफ अली खान मधे पडला. सैफवर या अज्ञात इसमाने वार केले. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या आहेत. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. IANS ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ही शस्त्रक्रिया अडीच तास सुरु होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. नीरज उत्तमणी यांनी काय सांगितलं?

डॉ. नीरज उत्तमणी म्हणाले, “सैफला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत” असं लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमणी म्हणाले होते. अडीच तासांनी ही शस्त्रक्रिया पार पडली न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल, असंही डॉ. उत्तमणी यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं? काय माहिती समोर आली?

सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात चोर शिरला होता. त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वांद्रे पोलीस याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत.

मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया

रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

वांद्रे भागात सैफ अली खानचं घर

वांद्रे भागात सैफ अली खानचं घर आहे. सैफ या घरात त्याची पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन मुलांसह राहतो. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सैफच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनास्थळी जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील तपासलंं जातं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor saif ali khan surgery lasted nearly two and a half hours he is currently in the recovery room scj