Ameesha Patel On Her Marriage :’गदर’ चित्रपटामुळे देशभरात ‘सकीना’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमीषा पटेल. ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिनं ‘गदर’, ‘ऐतराज’ व ‘हमराज’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

आपल्या सिनेमांमुळे कायमच चर्चेत राहिलेली अमीषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. वयाच्या पन्नाशीत असलेल्या अमीषाने अजूनही लग्न केलेले नाही. आजही ती तिचे आयुष्य एकाकीपणे जगत आहे. याबद्दल तिने आधी अनेकदा तिचे म्हणणे मांडले आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत तिने पुन्हा यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अमीषाने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं विसाव्या वर्षी लग्नाचं स्वप्न बघितलं होतं का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत अमीषा म्हणाली, “२० व्या वर्षी कशाला? मी तर अजूनही लग्नाची स्वप्ने बघते. मी खूप रोमॅंटिक आहे. याआधी माझे फार रिलेशनशिप झाले नाहीत. एखाद-दोनच झाले आहेत. मी माझ्या कामातच इतकी व्यग्र असते की, मला माझं स्वातंत्र्य आवडतं. रिलेशनशिप्समध्ये अनेकदा तुम्हाला वेळ द्यावा लागतो.”

यापुढे अमीषा म्हणाली, “मला माझं छोटंसं जग खूप प्रिय आहे, महत्त्वाचं आहे. त्यात जर लक्ष विचलित करणारं काही घडलं तर मला ते जमत नाही. शाळेत असतानाही मला माझ्या आयुष्यात अभ्यासाला आणि इतर कामांना अधिक प्राधान्य द्यायला आवडतं. माझ्या मागे मुलं असायची पण मी कायम अभ्यासाच्या मागे… मी हे कायम लक्षात ठेवलं की, माझी ही ओळख असता कामा नये की, मी एखाद्या मोठ्या घरची मुलगी आहे; त्यानंतर मी एका मोठ्या घरात सून म्हणून गेलीय. मला अनेक मागण्या आल्या. आजही येतात.”

यानंतर तिला अरेंज मॅरेज डेटवर गेली आहेस का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल ती म्हणाली, “मी कधीच डेटवर गेली नाही. हो… पण घरी जी एक-दोन स्थळं आली आहेत. त्या मुलांना मी भेटली आहे. त्यापैकी मी काहींचा विचारही केला होता. मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की, मी लग्नानंतर काम करू नये. त्यामुळे मी नाही म्हणाले. मला अमीषा पटेल बनायचं आहे. मी माझं बालपण कुणाची तरी मुलगी म्हणून घालवलं आहे; पण मला माझं तरुणपण कुणाची तरी पत्नी म्हणून घालवायचं नाही. मला माझी स्वतंत्र ओळख हवी आहे. माझ्यात ती क्षमता आहे. टॅलेंट आहे.”

यापुढे अमीषा सांगते, “माझ्यात काय टॅलेंट होतं किंवा काय क्षमता होती, हे मला माहीत नव्हतं. पण माझ्यात काहीतरी आहे आणि मला ते करायचं आहे हे पक्कं माहीत होतं. मला बँकिंग क्षेत्रात काम करायची इच्छा होती. मी स्टॉक मार्केटमध्ये काम केलं आहे. माझ्या वडिलांची कंपनीसुद्धा होती. पण एकदा सिनेमासाठी विचारणा झाली आणि तेव्हा मी करून बघू असा विचार केला. तो सिनेमा नाही चालला तरी ठीक. मी पुन्हा माझं स्टॉक मार्केटचं काम करेन, असा विचार केला.”

अमीषा पटेल इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे अमीषा म्हणते, “लोकांना वाटतं की माझ्यासाठी आयुष्य खूप सुंदर आहे अनेकांना वाटतं. कदाचित मी हे दाखवतेही. कारण, मी कायमच आनंदी असते. माझ्या आयुष्यातील अनेक संकटांना मी धीराने आणि हसत हसत उत्तर देते. घरी, मित्रांबरोबर किंवा माझ्या काही जवळच्या लोकांसमोर मी रडत असेनही कदाचित… पण जग ते बघत नाही. पण लोकांना मी खरी कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मी ‘रील’पेक्षा ‘रिअल’ आयुष्यात कशी आहे हे बघणं गरजेचं आहे असं वाटतं.”