Anupam Kher on Operation Mahadevn : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. सर्वच क्षेत्रातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. बॉलीवूड विश्वातील अनेक कलाकारांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

अशातच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. यात भारतीय सैन्याने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबद्दल भारतीय सैन्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे, अशातच बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा सरकार आणि सैन्याचं कौतुक केलं आहे.

अनुपम खेर यांनी ‘ऑपरेशन महादेव’च्या यशाबद्दल ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, “ज्या लोकांनी अमानुषपणे आपले २६ नागरिक मारले, अशा गुन्हेगारांचा अंत केल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. अशा गोष्टी एका रात्रीत होत नाहीत. यासाठी संयम लागतो आणि योग्य वेळेचीही वाट पाहावी लागते.”

यापुढे ते म्हणाले, “ही कारवाई गरजेची होती आणि ती यशस्वीपणे झाली; याबद्दल मला आपल्या भारतीय सैन्याचा अभिमान आहे. धर्माच्या आधारावर आपण निष्पाप नागरिकांचे गेलेले बळी आणि पत्नीसमोर झालेले असे निर्दयी खून सोडून दिले, तर त्यापेक्षा अमानवी काहीच असू शकत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची ही योग्य वेळ होती आणि सैन्याने ते करून दाखवलं.”

भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या सहकार्याने श्रीनगरमध्ये सोमवार (२८ जुलै) रोजी ‘ऑपरेशन महादेव’ सुरू केले. ही कारवाई याआधी पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा पुढचा टप्पा होती, ज्यात पाकिस्तान व पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले. यात लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कमांडर आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाशिम मुसाला त्याला ठार करण्यात आले.

दरम्यान, अनुपम खेर हे कायमच सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपली मतं अगदी रोखठोकपणे व्यक्त करत असतात. अशातच आता ‘ऑपरेशन महादेव’बद्दलही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून यासाठी त्यांनी भारतीय सैन्य आणि सरकारचे कौतुक केलं आहे. ही कारवाई करणं गरजेचंच होतं, असंही ते म्हणाले.