अभिनेत्री अर्चना पूरन सिंह सध्या चर्चेत आहे. अर्चनानं काही दिवसांपूर्वी स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. ती तिच्या पती व दोन मुलांसह मुंबईतील खाण्याच्या अनेक ठिकाणी जात असून, त्यादरम्यानचे व्हिडीओ ती या चॅनेलमार्फत शेअर करीत असते. अशातच नुकताच तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिनं यापूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओखाली एका चाहत्यानं, “तुम्ही खूप चांगले कपल आहात. त्यामुळे एकमेकांशी भांडू नका”, असं म्हटलं होतं. त्यावर अर्चनानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.
यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमधून ती म्हणाली, “मागे पोस्ट केलेल्या व्हिडीओखाली कोणीतरी कमेंट केली होती. त्यामध्ये ‘माझं माझ्या नवऱ्याशी भांडण झालं आहे. तुम्ही भांडू नका’, असं बरंच काही लिहिलेलं होतं. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की, आमच्यात असं कुठलंच भांडण झालेलं नाही. आम्ही ‘अशा’ पद्धतीनंच एकमेकांसह बोलत असतो. आम्ही भांडतो; पण नंतर एकमेकांशी संवाद साधून, त्यावर उपाय शोधतो. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये.”
अर्चना पूरन सिंह व परमित सेठी यांनी ३० जून १९९२ रोजी एकमेकांशी लग्न केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे लग्न केलं आहे ही बातमी या दोघांनीही चार वर्षं कोणालाच सांगितली नव्हती. आता या दोघांच्या लग्नाला जवळपास ३३ वर्षं झाली आहेत. ज्यावेळी या दोघांनी लग्न केलं तेव्हा परमित सेठी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘कच्चे धागे’, ‘हमको तुमसे प्यार है’, ‘रुस्तम’, ‘लैला मजनू’, ‘मिशन मजनू’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, अर्चना पूरन सिंहच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर ‘राजा हिंदुस्थानी’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मेला’, ‘बोल बच्चन’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम करीत तिच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकतंच तिनं स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. या माध्यमातून ती तिच्या कुटुंबीयांबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असते.