‘बिग बॉस ओटीटी’ सीझन ३ ची विजेती सना मकबूलला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीच्या मैत्रीणीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. नुकतंच अभिनेत्रीने ईदनिमित्त सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. प्रकृती बिघडल्याने ती रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. अशातच अभिनेत्रीनेही रुग्णालयातील तिचा फोटो शेअर केला आहे.

सना मकबूलची मैत्रीण डॉ. आशनाने सनाचा रुग्णालयामधील फोटो शेअर करत म्हटलं आहे, “तू खूप खंबीर आहेस, लवकरच यामधून बाहेर येशील. मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे. लवकर बरी हो. अल्लाह लवकरच तुला यातून बाहेर काढेल.” यावेळी अभिनेत्रीच्या मैत्रीणीने सनाचा रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. सना रुग्णालयामध्ये बेडवर बसलेली या फोटोमधून पाहायला मिळतं. अशातच अभिनेत्रीने स्वत: तिचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. यावेळी तिने फोटोखाली “माझ्यासाठी प्रार्थना करा” असं म्हटलं आहे.

सनाने भारती सिंहला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आरोग्याबद्दल सांगितलं होतं. अभिनेत्रीने तिला यकृत रोग आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असल्याचं सांगितलेलं. २०२० पासून ती या समस्यांमधून जात असल्याचं तिने म्हटलं होतं. यासाठी ती वैद्यकीय उपचार घेत असल्याचंही तिने सांगितलेलं. सना म्हणाली, “मला यकृताचा आजार आहे, २०२० मध्ये याचं निदान झालं होतं. त्याची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत. यामध्ये माझ्या शरीराच्या पेशी अवयवांसाठी त्रासदायक ठरतात.” २०२३ ला सना इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली होती, “जेव्हा सगळं सुरळीत सुरू असतं, नेमकं तेव्हा तुम्हाला आरोग्यांच्या समस्यांमधून जावं लागतं, त्यावेळी दुःख होतं. माझं काम नीट सुरू असताना मला प्रकृतीकडे लक्ष देण्याकरिता कामातून ब्रेक घ्यावा लागत आहे. मी माझ्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करत आहे.”

अभिनेत्री सना मकबूलची मैत्रीण आशनाची इन्स्टाग्राम स्टोरी

सनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘विष’ या मालिकेतील डॉ. आलिया सन्याल या भूमिकेसाठी ओळखली जाते. २०२१ साली ती ‘खतरों के खिलाडी’मध्ये झळकली होती. तिने २०२४ साली ‘दिक्कुलु चुडाकु रामय्या’ या तामिळ चित्रपटातून पदार्पण केलं होतं, तर ओटीटीवरील ‘बिग बॉस ओटीटी’च्या ३ पर्वामध्ये ती झळकली होती. यावेळी ती ‘बिग बॉस ओटीटी’च्या ३ पर्वाची विजेती ठरली होती.