Anupam Kher Lives On Rent : बॉलीवूड अभिनेते यांनी आजवर नानाविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या विनोदी भूमिकांसह अनेक गंभीर भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अभिनयामुळे सातत्याने चर्चेत राहणारे अनुपम खेर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आले आहेत. ते अनेकदा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणानं मतं व्यक्त करताना दिसतात. अशातच नुकत्याच घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या संपत्तीबद्दलची माहिती दिली आहे.
‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनुपम खेर यांनी आपलं कौटुंबिक आयुष्य आणि काही निर्णय याबद्दलची माहिती मनमोकळेपणानं दिली आहे. यावेळी त्यांनी कुटुंब, मुलगा, तसेच अजूनही ते भाड्याच्या घरात का राहतात? याबद्दलचे कारणही स्पष्ट केले.
‘द पॉवरफुल ह्युमन्स’ या पॉडकास्टमध्ये अनुपम खेर म्हणाले, “माझी अनेक घरं खरेदी करण्याची आर्थिक क्षमता आहे; पण तरीही मी भाड्याच्या घरात राहतो. माणसाला आयुष्यात फार थोड्याच गोष्टींची गरज असते-राहायला एक घर, चालवायला गाडी आणि कामासाठी दोन-तीन विश्वासू माणसं. घर म्हणजे घरच असतं-ते आपल्या नावावर असो की भाड्याचं, त्यानं काही फरक पडत नाही.”
पुढे अनुपम खेर यांनी स्पष्ट केलं, “मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात वाद होऊ नयेत म्हणून त्यांनी स्वत:चं घर घेतलेलं नाही. जेव्हा एखादा माणूस जातो, तेव्हा त्यानं मागे ठेवलेल्या मालमत्तेमुळे कुटुंबात वाद होण्याची शक्यता असते. पैशाचं वाटप होणं सोपं असतं; पण घर, जमीन यावरून भांडणं वाढतात. त्याबद्दल मी अनेक वयोवृद्ध लोकांशी बोललो आहे. काहींना त्यांच्या मुलांनी घरातून हाकलून दिलंय, काही जणांकडून जबरदस्तीनं सही करून घेतली गेलीय. मला माझ्या घरात अशा गोष्टी घडू द्यायच्या नाहीत.”
पुढे ते त्यांचा सावत्र मुलगा सिकंदरविषयी म्हणाले, “सिकंदर माझा सावत्र मुलगा आहे. आजकालची मुलं काही करण्याआधी वडिलांची परवानगी घेत नाहीत. मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात वडिलांची भूमिका करत नाही. ती भूमिका फक्त सिनेमात शोभते. मी कधीच सिकंदरला सांगत नाही की, त्यानं त्याचं काम कसं करावं. माझ्या वडिलांनीसुद्धा मला कधी काही करण्यास सांगितलं नव्हतं. पालकांनी आपल्या मुलांना मोकळीक दिली पाहिजे, म्हणजे ते स्वतः चुका करतील आणि त्यातून शिकतील.”