ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलनं गेल्या वर्षी पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. दोघांनी गेल्यावर्षी एका निवेदनाद्वारे “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे”, असं म्हणत विभक्त होण्याची घोषणा केली होती. मात्र वर्षभरातच हे जोडपं पुन्हा एकदा एकत्र आलं आहे.

ईशा व भरतच्या विभक्त होण्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असला तरी त्यांच्या नात्यात आधीपासूनच दुरावा होता असं काही वृत्तांमध्ये म्हटलं होतं. वर्षभरानं ईशा आणि भरत दोघे पुन्हा एकत्र आले आहेत आणि दोघांचा एकत्र फोटो स्वत: भरतने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

घटस्फोट झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर ईशा देओल आपल्या एक्स पती भरत तख्तानीसह पुन्हा एकदा एकत्र दिसली. या दोघांबरोबर ईशाची बहीण अहाना देओल आणि त्यांची एक मैत्रिणीही होती. भरतने स्वत: त्यांच्या या खास भेटीचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

भरतने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. या सेल्फी फोटोत ईशा, तिची बहीण अहाना आणि तिच्या शेजारी त्यांची एक मैत्रीणही असल्याचं दिसत आहे. तसंच भरतने स्वत: हा सेल्फी फोटो काढला असून त्याने ‘फॅमिली संडे’ अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.

भरत तख्तानी इन्स्टाग्राम स्टोरी

भरत तख्तानीने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

काही दिवसांपूर्वी, ‘मामाराझ्झी’ या कार्यक्रमात, ईशाने भारतबरोबरच्या नात्याबद्दल आणि घटस्फोटानंतर मुलांचा एकत्रित सांभाळ करण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती, याबद्दल ईशा म्हणाली होती, “कधी कधी जीवनात काही गोष्टींमुळे जबाबदाऱ्या बदलतात. दोन व्यक्तींमधील नातं पूर्वीसारखं नसेल, दोघे वेगवेगळे राहत असतील, तरीदेखील त्यांना मुलांसाठी एकत्र राहणं गरजेचं असतं आणि हेच आम्ही – मी आणि भरत करत आहोत.”

अशातच आता भरत आणि ईशा यांनी पुन्हा एकत्र फोटो शेअर केला आहे. घटस्फोट झाल्यानंतरही हे जोडपं एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच दोघांच्या नात्याबद्दलही पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. ईशा आणि भरतचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. मात्र, ११ वर्षांनी, २०२४ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत.