‘सौगंध’ चित्रपटात अक्षय कुमारसह स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री शांतीप्रियाने दिग्गज चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांचा नातू सिद्धार्थ रे याच्याशी लग्न केलं होतं. व्ही. शांताराम यांच्या कन्या चारुशीला रे शांतीप्रियाच्या सासूबाई होत. सर्वकाही सुरळीत चाललं होतं आणि सिद्धार्थ व शांतीप्रियाला दोन मुलं झाली. अशातच अचानक २००४ मध्ये सिद्धार्थ रे याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि शांतीप्रिया अवघ्या पस्तिशीत विधवा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ रे हा लोकप्रिय अभिनेता होता. त्याने ‘अशी ही बनवाबनवी’ मध्ये शांतनूची भूमिका केली होती. याशिवाय त्याने शाहरुख खानसह १९९२ मध्ये आलेल्या ‘बाजीगर’ चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्याने ‘वंश’, ‘पनाह’, ‘बिच्छू’, ‘जानी दुश्मन’, ‘एक अनोखी कहानी’, ‘परवाने’, ‘युद्धपथ’, ‘तिलक’ आणि ‘मिलिटरी राज’ या चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिका होत्या. २००४ मध्ये आलेला ‘चरस – अ जॉइंट ऑपरेशन’ हा सिद्धार्थचा शेवटचा चित्रपट ठरला. शांतीप्रियाने पतीच्या निधनानंतर एकटीने मुलांचा सांभाळ कसा केला, याबाबत एका मुलाखतीत सांगितलं आहे.

वास्तव स्वीकारायला लागला वेळ!

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत पतीच्या निधनाबद्दल शांतीप्रिया म्हणाली, “तो खूप तरुण होता, तो फक्त ३८ चा होता. त्यावेळी माझा एक मुलगा १० वर्षांचा तर दुसरा साडेचार वर्षांचा होता. मी काम सोडलं आणि गृहिणी झाले. मुलांना सांभाळणं, कुटुंबियांबरोबर वेळ घालवणं हे करू लागले. सासरची मंडळी सोबत राहत नव्हती, पण त्यांना पुण्याला भेटायला जायचो. ‘इक्के पे इक्का’नंतर जवळपास १५ वर्षे कुणीही माझे फोटो पाहिले नसतील. ‘बाजीगर’च्या प्रीमिअरचे फोटो असतील, त्यानंतर कोणतेही फोटो नव्हते. मी धक्क्यात होते आणि मग मी माझ्या आईकडे पाहिलं, कारण माझी आई एकल माता (सिंगल मदर) होती. सर्वात आधी तर मी एकटी आहे हे सत्य स्वीकारायलाच मला काही महिने लागले. मला दोन्हीही मुलं असल्याने स्त्रीपेक्षा पुरुषाची भूमिका जास्त निभावावी लागली, कारण मुलांचं संगोपन वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि मुलींचं संगोपन वेगळ्या पद्धतीने केलं जातं. इथे मी ७० टक्के पुरूष आणि ३० टक्के स्त्री अशी भूमिका बजावत होते.”

अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी सोडलं बॉलीवूड, आता काय करतात? जाणून घ्या

पतीच्या निधनानंतर मुंबईत राहण्याचा अनुभव

पतीच्या निधनानंतर मुंबईत राहण्याबद्दल शांतिप्रिया म्हणाली, “जेव्हा तुम्ही दक्षिण मुंबईत राहता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी जज केलं जातं. तुम्ही कोणत्या ब्रँडचे कपडे घालताय, तुम्ही कोणती कार चालवत आहात, कोणत्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही राहता या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. मुंबईत पालकांच्या पाठिंब्याशिवाय राहणं, ही वेगळीच गोष्ट आहे. माझ्या माहेरकडील कोणतेही नातेवाईक मुंबईत नाहीत. फक्त सिद्धार्थचे नातेवाईक मुंबईत आहेत. त्याचं कुटुंब खूप मोठं आहे.”

अक्षय कुमारच्या सिनेमामुळे बुडाले पैसे, आता तोच धिरज देशमुखांच्या सासऱ्यांच्या मदतीसाठी आला पुढे; जॅकी भगनानी म्हणाला…

पुढे ती म्हणाली, “सिद्धार्थच्या तेराव्याच्या पूजेनंतर मुंबईत घरातील सर्वांची बैठक झाली. आईने मला विचारलं तू परत येतेय ना आणि मी विचारात पडले. तू इथे एकटी काय करणार? तुझ्या मुलांची काळजी कोण घेणार? तू काम करत नाहीयेस, तुला आधार कोणाचा आहे? तुझ्याजवळ इथे कोणीही नाही आणि आम्ही तिकडे राहतो. आम्ही चेन्नईहून मुंबईला विमानाने यायचं ठरवलं तरी किमान तीन तास लागतील . तर तू एकटी हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? मी म्हणाले, नाही. मी इथे राहिले आहे. माझ्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. हेच माझं कुटुंब आहे. त्यामुळे मी त्यांना सोडून जाणार नाही.”

सिद्धार्थच्या आजीबरोबर शांतीप्रियाचं कनेक्शन

शांतीप्रिया म्हणाली, “त्यावेळी सिद्धार्थची आजी होती, मी तिची काळजी घेईन असा त्याला खूप जास्त विश्वास होता. त्याचं निधन झालं तेव्हा ती ९० वर्षांची होती. मी म्हटलं की, मी तिला सोडू नाही शकत. कारण ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते आणि मी त्याला आजीमध्ये बघत होते. त्यामुळे मी म्हटलं की, मी कुठेही जाणार नाही. हे माझं घर आहे आणि मी तुमच्याबरोबर येणार नाही. आईने विचारलं, तू सगळं मॅनेज करशील, अशी तुला खात्री आहे का? आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. मी तिला हो म्हटलं. पण आता मी येणार नाही असं तिला सांगितलं आणि मुंबईतच थांबण्याचा निर्णय घेतला.”

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

आईकडून मिळालेल्या ताकदीमुळे झालं शक्य!

शांतप्रिया म्हणाली, “मी माझ्या आईकडे पाहून म्हणाले, जर तू एकटी हे सगळं करू शकतेस तर मी का नाही. ती शिकलेली नाही. आज मी अभिमानाने म्हणत असेन की, मी शांतीप्रिया आहे किंवा माझी बहीण म्हणत असेल की ती भानूप्रिया आहे, तर ते फक्त तिच्यामुळे. शिकलेली नसूनही जर ती हे करू शकत असेल तर मी का नाही. मी सुशिक्षित आहे, माझं करिअर आहे, मी माझं करिअर रिस्टार्ट करू शकते आणि माझं स्वतःचं नाव आहे, मग का नाही? अशा रितीने मी फक्त आईकडून मिळालेल्या ताकदीमुळे हे सगळं करू शकले.”

“गर्लफ्रेंडची जात वेगळी असल्याने आईने दिला नकार”, ‘सैराट’ फेम तानाजीचा खुलासा; म्हणाला, “जातव्यवस्था हे सर्वात मोठं…”

कठीण काळात कोणीही मदतीला आलं नाही

आपल्याबरोबर बरं-वाईट काही घडलं की,आजूबाजूचे लोक बदलतात. पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण काळात तुला काही अनुभव आला का? असं विचारल्यावर शांतीप्रिया म्हणाली, “मी कधीच मदतीसाठी कुणाकडेही गेले नव्हते. देवाच्या कृपेने माझे कुटुंबीय तिथे होते. मी काहीच काम केलं नाही तरी घर चालवू शकेन अशी घरची परिस्थिती होती. पण या काळात कुणीही स्वतःहून येऊन तुला काही मदत हवी आहे का, अशी विचारणा केली नव्हती. मी सगळं कसं सांभाळतेय, यात लोकांना जास्त रस होता आणि त्याचा सर्वात जास्त त्रास व्हायचा. लोक माझ्या घरी मी कसं राहतेय ते पाहायला यायचे.”

पुढे ती म्हणाली, “लोकांनी फक्त माझं सासर पाहिलं होतं, कारण लग्न मुंबईत झालं. कोणीही माझं माहेर पाहिलेलं नव्हतं. त्यांना शांतीप्रिया भानूप्रियाची बहीण आहे आणि तिने सिद्धार्थशी लग्न केलं इतकंच माहीत होतं. कुणालाही माझ्या माहेरी काय परिस्थिती आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे अचानक इकडचे लोक चेन्नईला गेले. मी सगळं कसं सांभाळतेय, मुलांना कसं वाढवतेय ते बघायला ते तिकडे गेले हे पाहून मला खूप वाईट वाटलं होतं. मी त्या गोष्टीतून खूप काही शिकले आणि पुढे गेले, आयुष्यात खूप गोष्टी सहन केल्यात. माझ्यासाठी माझी आई, बहीण व माझा भाऊ माझे आधारस्तंभ होते, त्यानंतर माझी मुलं. माझ्या मुलांनी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा माझ्याबरोबर सामना केला,” असं शांतीप्रिया भावूक होत म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress shanthi priya talks about husband siddharth ray death v shantaram grandson entdc hrc