‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर चर्चेत आले. गेल्या दोन वर्षांपासून ते या चित्रपटाच्या कामात व्यग्र होते. १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. देशभरातून सर्व प्रेक्षकांकडून या चित्रपटाचं, त्यातील कलाकारांचं कौतुक करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर पहिल्यांदाच हिंदीत इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनवला गेला. त्यामुळे प्रेक्षकांकडून यासाठी चित्रपटाच्या टीमचं विशेष कौतुक झालं.
लक्ष्मण उतेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. परंतु, ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आले ते ‘छावा’ या चित्रपटामुळे. अशातच आता त्यांनी नुकतंच बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाबद्दल अप्रत्यक्षपणे वक्तव्य केलं आहे. ‘मामास काउच’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनुराग कश्यप यांचा उल्लेख न करता “माझी बॉलीवूडमध्ये राहण्याची इच्छा नाहीये, मला बॉलीवूड सोडायचं आहे असं काही लोक म्हणतात, यावर तुमचं काय मत आहे”. असं विचारण्यात आलं. यावर लक्ष्मण उतेकर म्हणाले, “जा मग बिनधास्त जा, ज्यांना राहायचं नाही त्यांनी खुशाल जा, कोणी जबरदस्ती करत नाहीये. ही इंडस्ट्री अशी आहे, जिथे तुम्हाला सर्जनशील असावं लागतं. इथे आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती उत्तम असावी लागते, तरच आपण चांगले चित्रपट बनवू शकतो. पण, जर तुमची इच्छाच नसेल इथे राहण्याची तर तुम्ही चांगले चित्रपट कसे बनवाल.”
लक्ष्मण उतेकर पुढे म्हणाले, “प्रेक्षकांमध्ये त्यांचे चित्रपट स्वीकारण्याची संवेदनशीलता नाही असं बोलणं चुकीचं आहे, तर प्रेक्षकांची पसंती हेरण्याची आणि स्वीकारण्याची त्यांची तयारी नाहीये. पूर्वी चित्रपटांनी १०० कोटींची कमाई करणं मोठी गोष्ट होती, आता ७००-८०० कोटी इतकी कमाई चित्रपटांमुळे होते, मग कोण म्हणतंय की चित्रपट संपत चाललेत. ‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘आर.आर.आर’, ‘छावा’ या चित्रपटांनी ८०० कोटींची वगैरे कमाई केली; मग तुम्ही म्हणूच कसं शकता की चित्रपट मरत आहेत. तुमच्या संवेदनशीलतेत बदल होण्याची गरज आहे. प्रेक्षकांकडे त्यांच्या फोनवर जगातील असंख्य चित्रपट पाहण्याची सोय आहे.”
“प्रेक्षकांनी तुमच्यापेक्षा जास्त प्रगती केलेली आहे, कारण त्यांना माहीत आहे काय पाहायचं आहे आणि काय नाही. प्रत्येक तीन वर्षांनी चित्रपट बदलत आहे. प्रत्येक बाबतीत चित्रपट बदलत आहे. चित्रपट निर्माते म्हणून तुम्हाला स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, कारण तुम्ही एकाच जागी राहून प्रेक्षकांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत असं म्हणू शकत नाही.”