अभिनेत्री दिव्या दत्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत दिग्गज अभिनेता इरफान खानबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. दोघांनी २०१० मध्ये आलेल्या ‘Hisss’ चित्रपटात काम केलं होतं. दिव्याच्या मते, या सिनेमातील एका इंटिमेट सीनच्या शूटिंग दरम्यान इरफान तिच्यापेक्षा जास्त घाबरले होते. ते खूप विचार करत होते. मग दिग्दर्शक जेनिफर लिंचने त्यांची मदत केली होती.
दिव्या दत्ताने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आदित्य चोप्राने तिला एक खूप मोलाचा सल्ला दिला. यश चोप्रा यांनी दिव्याला ‘वीर-झारा’ या चित्रपटातील एका खास भूमिकेतून लाँच केलं होतं, हा चित्रपट सुपरहिट झाला आणि दिव्याचं करिअर घडलं.
आदित्य चोप्राने दिलेला सल्ला कोणता?
दिव्या दत्ता म्हणाली, “आदिने मला विचारलं ‘तुला पैशांची गरज आहे का?’ मी म्हटलं, ‘तू असं का म्हणतोय?’ त्याने विचारलं की मी इतके चित्रपट का करत आहे? मी म्हणाले कारण मी व्यग्र आहे, लोकांना मी त्यांच्या चित्रपटात हवी आहे… तो म्हणाला की तू एक चांगली अभिनेत्री आहेस. असे काम कर की लोकांना तुझं काम आठवेल. कारण तू निवडलेला प्रत्येक चित्रपट महत्त्वाचा असतो.”
आदित्य चोप्राच्या या सल्ल्यानंतर दिव्या दत्ताने अनेक चित्रपट नाकारले. करिअरमध्ये योग्य चित्रपटांची निवड किती गरजेची आहे ते मला समजलं. दिव्याने अनेक चित्रपट नाकारून मानधनही परत केले. ती तिच्या करिअरची दिशा बदलण्याचं श्रेय आदित्य चोप्राला देते.
इंटिमेट सीनबद्दल काय म्हणाली दिव्या?
दिव्या दत्ताने याच मुलाखतीत इंटिमेट सीन्सच्या शूटिंगची आठवणही सांगितली. तिला ‘हिस्स’ मध्ये इरफानला किस करायचं होतं. एक महिला दिग्दर्शक असल्याने दिव्याला आनंद झाला होता, कारण तिच्यामुळे शूटिंग करणं दिव्यासाठी सोपं गेलं. ती या किसिंग सीनच्या शूटिंगवेळी अजिबात घाबरली नव्हती. पण इरफान खान घाबरले होते.
दिव्या दत्ता म्हणाली, “जेनिफर लिंचने (दिग्दर्शिका) आम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. तो एक सुंदर सीन होता. मी विचारलं, ‘इरफान कुठे आहे?’ ती म्हणाली, ‘तो छतावर आहे, तो तुझ्यापेक्षा जास्त घाबरला आहे.’ मी वर गेले आणि त्यांना म्हणाले, ‘चला सीन शूट करूया, सगळं ठीक होईल.’ जेनिफर आम्हाला वारंवार सांगत होती की तुम्ही एक कपल आहात, तुम्हाला मूल हवं आहे, त्यासाठी तुम्ही हा सीन करताय… तिने आम्हाला अशा मूडमध्ये आणलं जिथे आमचा सर्व संकोच, भीती सगळं निघून गेलं. मला जाणवलं की एक संपूर्ण युनिट तो सीन चांगला व्हावा, यासाठी काम करत होते.”
‘हिस्स’ मध्ये मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होती. दिव्या दत्ता, इरफान खान, गोविंद मेननसह इतर कलाकारांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.