‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत काही दिवसांपूर्वी २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. सध्या या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देशातील काही लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे, तर याउलट काही जण चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत यावर टीका करीत आहेत. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दिन शाह यांनी अलीकडेच या चित्रपटावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संपादक आणि केरळ राज्य चलतचित्र अकादमीच्या माजी उपाध्यक्षा बीना पॉल यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर सडकून टीका केली आहे. हेही वाचा : तुर्कीला जाऊन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने का नेसली साडी? पोस्ट शेअर करत सांगितले कारण… ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त करताना बीना पॉल म्हणाल्या, "चित्रपटाला अनावश्यक इतका नफा मिळाल्याने मी खरंच अस्वस्थ आहे. या चित्रपटाबद्दल कोणी भाष्य केले नसते, तर हा चित्रपट इतका चालला नसता आणि कधीच संपला असता. चित्रपटाचा ट्रेलर चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे त्यात बदल करावा लागला आणि त्याबद्दल कोणीही काही बोलले नाही. खरं तर चुकीचा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे मला खूप वाईट वाटत आहे. मी हा चित्रपट अजूनही पाहिलेला नाही, पण चित्रपटात काहीही तथ्य नसून त्याला कोणतेही सिनेमॅटिक मूल्य नाही असे ऐकून आहे." हेही वाचा : “बाळा, तू मला वचन दे” लेकाच्या वाढदिवशी जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली “तुला आता आई-बाबांची गरज…” बीना पॉल पुढे म्हणाल्या, "मला केरळमधील लोकांचा अभिमान वाटतो की, त्यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिला नाही आणि त्यामुळेच मल्याळममध्ये चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही." बीना पॉल यांच्या आधी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दिन शाह, अभिनेते कमल हासन, शत्रुघ्न सिन्हा, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही टीका केली होती. हेही वाचा : ‘जरा हटके जरा बचके’साठी सारा अली खानची निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले, “एक देसी अंदाज…” दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यामुळे अनेक भागांत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तर याउलट काही भागांत हा चित्रपट 'करमुक्त' करण्यात आला होता.