पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची २०२२ साली हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई व त्याच्या गँगने सिद्धू मूसेवालाची हत्येची जबाबदारी घेतली होती. बीबीसीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘द किलिंग कॉल’ या डॉक्युमेंटरीमध्ये, बिश्नोईच्या गँगमधील गोल्डी ब्रारने म्हटलंय की सिद्धूची लॉरेन्सशी २०१८ पासून मैत्री होती. सिद्धू लॉरेन्सला दररोज ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाईट’चे मेसेज पाठवायचा, असा दावा गोल्डीने केला आहे.

गोल्डी ब्रार एका ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये म्हणाला, “लॉरेन्स सिद्धूच्या संपर्कात होता. मला माहीत नाही की त्यांची ओळख कोणी करून दिली आणि मी कधीही विचारलं नाही, पण ते एकमेकांशी बोलायचे. सिद्धू लॉरेन्सला खूश करण्यासाठी ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाईट’ असे मेसेज पाठवत असे.”

“सिद्धू मला म्हणाला होता की लॉरेन्स बिश्नोईने मला फोन केला होता. लॉरेन्सने त्याला तुरुंगातून फोन केला होता. लॉरेन्सला सिद्धूचं संगीत खूप आवडतं आणि सिद्धू खूप चांगलं काम करतोय,” असं नाव न सांगण्याच्या अटीवर सिद्धूच्या एका मित्राने सांगितलं. दोघे २०१७-२०१८ पासून संपर्कात आले आणि सिद्धू भारतात परत येईपर्यंत संपर्कात होते.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सिद्धूची बिश्नोईशी मैत्री होती, पण तो कथितपणे बिश्नोईच्या विरोधक बम्बीहा टोळीशी मैत्री करू लागला होता. बम्बीहा टोळीने आयोजित केलेल्या कबड्डी सामन्यामुळे सिद्धू आणि बिश्नोई टोळीमधील तणाव वाढला. माहितीपटाच्या दुसऱ्या भागात गोल्डी म्हणाला, विक्की मिद्दुखेराच्या हत्येतील कथित सहभागामुळे सिद्धूची हत्या झाली. बम्बीहा टोळीने विक्कीची हत्या केली होती, पण सिद्धूची बम्बीहा टोळीशी मैत्री असल्याने लॉरेन्सचा त्याच्यावर संशय बळावला.

‘आमच्याकडे सिद्धू मूसेवालाला मारण्याशिवाय पर्याय नव्हता’ – गोल्डी ब्रार

गोल्डी म्हणाला, “विक्कीच्या हत्येत सिद्धूची भूमिका सर्वांना माहीत होती, पोलिसांनाही आणि अगदी पत्रकारांनाही माहीत होतं. तो आपल्या राजकीय शक्तीचा, पैशाचा, आपल्या संसाधनांचा वापर आमच्या विरोधकांना, आमच्या भावाला मारणाऱ्यांना मदत करण्यासाठी करत होता. त्याने जे केलं, त्यासाठी त्याला शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा होती. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्याला तुरुंगात टाकायला पाहिजे होतं, पण आमची बाजू कोणीच ऐकून घेतली नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच सगळं करायचं ठरवलं. आमच्याकडे त्याला मारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला त्याच्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागले. एक तर तो किंवा आम्ही. एवढंच.”