This Bollywood Actor Praises Nana Patekar Nana Patekar’s Natsamrat Movie : बॉलीवूडमधील कलाकार अनेकदा मराठी चित्रपट, रंगभूमी, मराठी कलाकार यांचं कौतुक करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेते परेश रावल यांनीसुद्धा मराठी रंगभूमी व त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं कौतुक केलं होतं. अशातच आता अजून एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने अभिनेते नाना पाटेकर व त्यांच्या नटस्रमाट या मराठी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

नुकताच ‘फिल्मफेअर मराठी’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मराठीसह हिंदीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. मराठी चित्रपट व कलाकारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. यावेळी काही हिंदी कलाकारांनीसुद्धा मराठी कलाकार व चित्रपटांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. अशातच प्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावतनेसुद्धा याबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अमेय वाघ या सोहळ्याचं सूत्रसंचालन करत असताना त्याने अभिनेत्री अमृता सुभाष व जयदीप अहलावत उपस्थित असताना तिला “जयदीपला तुला काही विचारायचं असेल तर विचार” असं सांगितलं. यानंतर अमृताने जयदीपला “तुला मराठी सिनेमांबद्दल काय वाटतं?” असा प्रश्न विचारला. अमृताने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना जयदीप म्हणाला, “माझी मराठीबरोबरची पहिली ओळख म्हणजे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक.

जयदीप पुढे म्हणाला, “या नाटकानंतर मला समजलं की मराठीमध्ये किती कमालीचे लेखक आहेत. मराठी थिएटर खूप सुंदर आहे. मी अनेक मराठी चित्रपट पाहिले आहते.” यामध्ये जयदीपने पुढे अभिनेते नाना पाटेकर यांचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, “एक दिग्गज व्यक्ती आपल्यामध्ये आज बसलेली आहे. मी ‘नटसम्राट’बद्दल हिंदीमध्ये खूप वाचलं होतं. नंतर त्यावर चित्रपट बनवण्यात आला. सर, तुम्ही खूप छान काम केलं त्यात, धन्यवाद, तो चित्रपट बनवल्याबद्दल.”

दरम्यान, जयदीपच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर अनेक चित्रपट वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘पाताल लोक’, ‘राजी’, ‘खट्टा मीठा’, ‘कमांडो’, ‘गब्बर इज बॅक, ‘रईस’ ‘बागी ३’, ‘बार्ड ऑफ ब्लड’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘ब्लडी ब्रदर्स’, ‘ज्वेल थीफ’, ‘जाने जान’, ‘महाराज’ यांसारख्या अनेक कलाकृतींमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.