जावेद अख्तर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक आणि गीतकार म्हणून भरीव योगदान दिलं आहे. सलीम खान व जावेद अख्तर यांच्या ‘सलीम-जावेद’ जोडीने ‘शोले’ आणि ‘दीवार’ सारखे क्लासिक चित्रपट बॉलीवूडला दिले. त्याचबरोबर जावेद यांनी ‘तेजाब’ आणि ‘लगान’सह अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली, जी खूप गाजली. कवी, पटकथा लेखक आणि गीतकार म्हणून त्यांनी इंडस्ट्रीत खूप काम केलंय.

जावेद अख्तर ६१ वर्षांपूर्वी मुंबईत आले होते. त्यांच्या खिशात त्यावेळी फक्त २७ पैसे होते. राहायला घर नव्हतं, हाताला काम नव्हतं त्यामुळे कित्येकदा ते उपाशी राहिले. जावेद अख्तर यांनी यासंदर्भात एक पोस्ट करून महाराष्ट्राचे, मुंबईचे आणि भारताचे आभार मानले आहेत.

“एक १९ वर्षांचा मुलगा ४ ऑक्टोबर १९६४ रोजी २७ पैसे खिशात घेऊन बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर उतरला होता. राहायला घर नव्हतं, उपासमार, बेरोजगारी या सगळ्या गोष्टी मी पहिल्या. पण, आता जेव्हा मी आयुष्याची एकूण गोळाबेरीज करतो, तेव्हा मला वाटते की, मी नशिबवान आहे. त्यासाठी मी मुंबई, महाराष्ट्र, माझा देश आणि माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद,” अशी पोस्ट जावेद अख्तर यांनी एक्सवर केली आहे.

जावेद अख्तर यांची पोस्ट

जावेद अख्तर यांना करिअरच्या सुरुवातीला गुरु दत्त यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून दिग्दर्शक व्हायचं होतं, परंतु दुर्दैवाने त्यांची भेट होऊ शकली नाही. नंतर जावेद अख्तर यांनी सलीम खानबरोबर चित्रपट लिहिले. त्यांच्या ‘सलीम-जावेद’ या जोडीने एकत्र ‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’, ‘त्रिशूल’, ‘डॉन’, ‘दोस्ताना’, ‘सीता और गीता’ आणि ‘यादों की बारात’ अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी पटकथा, कथा आणि संवाद लेखन केले. सलीम जावेद यांच्या जोडीने एकूण २४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यापैकी २० चित्रपट हिट झाले होते.

पटकथालेखनात यश मिळवल्यानंतर, जावेद अख्तर यांनी गीतकार म्हणून काम सुरू ठेवले. ‘तेजाब’, ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’, ‘बॉर्डर’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ आणि ‘गली बॉय’ सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी उत्तम गाणी लिहिली.

जावेद अख्तर यांना त्यांच्या कामासाठी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.