काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, "SRK मेहनत..." |Kajol talks about difference between Shah Rukh Khan and Ajay Devgn | Loksatta

काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, “SRK मेहनत…”

‘शाहरुख इतका मोठा स्टार का झाला?’ काजोलने दिलेलं उत्तर ठरतंय चर्चेचा विषय

काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, “SRK मेहनत…”
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री काजोल आणि शाहरुख खान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक आहेत. त्यांचा आयकॉनिक चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आजही अनेकांचा आवडता चित्रपट आहे. काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

हेही वाचा – दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने उघड केलं ‘पठाण’ चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकमागचं गुपित; म्हणाला…

दरम्यान, अलीकडेच ‘बिअरबिसेप्स पॉडकास्ट’शी संवाद साधताना काजोलने शाहरुखच्या सातत्यपूर्ण स्टारडमबद्दल भाष्य केलं. तसेच काही जुने किस्सेही सांगितले. काजोल म्हणाली, “शाहरुख अशा लोकांपैकी एक आहे, ज्याने स्क्रीनवर तो कोण आहे आणि तो कोण असायला हवा हे खूप लवकर ओळखलं आणि त्या अपेक्षांवर काम केलं. मला आठवतंय एकदा त्याच्या वाढदिवशी मी असं म्हणाले होते, ‘तुझा वाढदिवस आहे आणि मी तुला भेटायला येत आहे’. तो म्हणाला, ‘ये, ये, पण आजचा दिवस चांगला नाही’. मी विचारलं ‘का?’ तर तो म्हणाला, ‘मला बाहेर जावं लागेल, मला या सगळ्या लोकांना भेटावं लागेल, मुलाखती द्याव्या लागतील. माझा वाढदिवस आता माझा स्वतःचा नाही. मी या लोकांचा आहे’ आणि हाच खरा शाहरुख आहे.”

हेही वाचा – तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये

काजोल म्हणाली की तिला कोणीतरी एकदा विचारलं होतं की शाहरुख इतका मोठा स्टार का झाला? ती म्हणाली, “याचं उत्तर खूप सोपं आहे. कारण त्याने त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. कदाचित तो त्याची मेहनत दाखवत नसेल आणि अजय देवगण दाखवतो. पण तो कोण आहे, हे सिद्ध करण्यासाठी तो आठवड्यातले सातही दिवस आणि २४ तास काम करतो. आजही तो तसाच आहे, पण तो बदलतदेखील आहे आणि इतर नवनवीन गोष्टीही करतोय.”

हेही वाचा – Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

गेल्या काही वर्षांत शाहरुख कसा बदलला आहे, याबद्दल विचारले असता काजोल म्हणाली की तिने मागच्या काही काळापासून त्याच्याबरोबर काम केलं नाही, पण तो आता स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करतोय. तसेच वैयक्तिक जीवनावरही लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरेसा वेळ काढत आहे.

दरम्यान, काजोल आणि शाहरुखने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘करण अर्जुन’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. शाहरुख जानेवारीमध्ये ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, काजोल ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 12:58 IST
Next Story
“मला काळी मांजर आणि सावळी म्हणून…” बॉलिवूडमधील वर्णभेदावर प्रियांका चोप्राने ओढले ताशेरे