बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं की आपल्यासमोर आपसूकच नाव येतं ते आमिर खानचं. आमिर खान त्याच्या चित्रपटांमुळे त्याच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो. मुलाखतींमध्ये आमिर खान उत्तरं अशी काही देतो की त्याचे चाहतेही विचारात पडतात. याच आमिर खानने कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा हा शो आहे. या शोचा एक प्रोमो सध्या चर्चेत आहे. त्यावरुन आमिर खान ज्या एपिसोडमध्ये येणार त्यात धमाल होणार हेच दिसतंय. एक प्रश्न आमिर खानला कपिल विचारतो तेव्हा त्याचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला आहे.

चित्रपट फ्लॉप होण्याबद्दल काय म्हणाला आमिर?

“माझे मागचे दोन चित्रपट फ्लॉप झाले आहेत. पण दोनच.” असं आमिर म्हणतो तेव्हा त्याला कपिल पटकन म्हणतो की तुझे फ्लॉप चित्रपटही उत्तम व्यवसाय करतात. लाल सिंग चढ्ढा आणि ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारलं. पण आमिरने ती बाब हलकेफुलकेपणात बोलून सोडून दिली आहे. पहिल्यांदाच आमिरने एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली आहे. आमिर खान रिअॅलिटी शो आणि अवॉर्ड शोमध्ये फारसा जात नाही.

माझी मुलं माझं ऐकत नाहीत

या शोच्या प्रोमोची चर्चा चांगलीच रंगली आहे. आमिर या शोमध्ये म्हणतो, “आज बोलताना माझ्या मनातल्या गोष्टी बाहेर येणार आहेत. मी खरं सांगतोय माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत.” आमीर त्याच्या कपड्यांबाबतही बोलला. आमिर म्हणाला, “आज इथे येण्यापूर्वी मी काय कपडे घालायचे आहेत? यावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर मी हे कपडे घालून आलो.” अर्चना पूरणसिंग म्हणतात, “तू तर चांगले कपडे घातले आहेस रे.” त्यावर आमिर म्हणतो, “हो पण मी शॉर्ट्समध्ये येणार होतो.” ज्यानंतर सगळे हसू लागतात.

आमिर अवॉर्ड शोजमध्ये का जात नाही?

या प्रोमोमध्ये अवॉर्ड शोज ना जाण्याचं कारणही आमिर खानने सांगितलं आहे. अर्चना पूरणसिंग विचारतात, तू अवॉर्ड शोमध्ये का जात नाहीस? त्यावर आमिर म्हणतो, “वेळ खूप मौल्यवान आहे, त्याचा उपयोग योग्यप्रकारे केला पाहिजे.” हे ऐकूनही सगळे हसू लागतात. थ्री इडियट्स, पी. के. या चित्रपटांतल्या आठवणीही आमिरने भरभरुन सांगितल्या आहेत असं दिसतं आहे.

तू सेटल कधी होणार आहेस?

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाल्यापासून आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. आमिर खान फातिमा सना शेखसह तिसरं लग्न करणार अशा अफवाही आल्या होत्या. याच अनुषंगाने काहीसा असाच प्रश्न आमिरला कपिल शर्मा विचारतो. कपिल विचारतो, “आमिरसर तुम्हालाही वाटतं का आता सेटल झालं पाहिजे?” त्यावर आमिर काही सेकंदासाठी शांत होतो आणि त्यानंतर तो हसतानाच दाखवला आहे. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर शनिवारी रात्री ८ वाजता म्हणजेच नेटफ्लिक्सवर हा एपिसोड आल्यावरच मिळू शकणार आहे. मात्र अवघ्या काही सेकंदासाठी आमिरचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे ही बाब आपल्या नजरेतून सुटत नाही.