बॉलीवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक वाद आणि अफवा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत. सध्या ‘बिग बॉस १९’मध्ये असलेल्या अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या आणि कुमार सानू काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
तसंच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या शोमध्ये कुनिका यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कुमार सानू यांच्याबरोबरच्या नात्याचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी पुन्हा अप्रत्यक्षपणे सांगितलं की, त्यांना त्या नात्यात फसवण्यात आलं होतं. या खुलाशानंतर पुन्हा एकदा कुमार सानू यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू झाली आहे.
कुमार सानू यांचे पहिले लग्न रीटा भट्टाचार्य यांच्याशी झाले होते. मात्र, १९९४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्यावर पत्नीला फसवल्याचे आरोप झाले. याच काळात मीनाक्षी शेषाद्री यांच्याशी त्यांचे अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. वृत्तांनुसार, कुमार सानू आणि मीनाक्षी शेषाद्री यांची पहिली भेट महेश भट यांच्या ‘जुर्म’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झाली होती.
याच चित्रपटासाठी कुमार सानू यांनी ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणे गायले होते, ज्यात मीनाक्षी शेषाद्री आणि विनोद खन्ना होते. तेव्हापासूनच कुमार सानू आणि मीनाक्षी यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. या अफवांमुळेच त्यांचं लग्न मोडलं, असंही म्हटलं गेलं. मात्र, कुमार सानू यांनी या सगळ्याला विरोध केला. त्यानंतर आता कुमार सानू यांनी त्यांच्याबद्दलच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
जनसत्ताच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत कुमार सानू यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “मी कधीच मीनाक्षी शेषाद्रीला भेटलो नाही. हे सगळं केवळ बिनबुडाचं बोलणं आहे. माझं तिच्याबरोबर कोणतंच नातं नव्हतं.”
यापुढे ते म्हणाले, “मी आयुष्यात अनेकदा ऐकलं आहे की, मी वुमनायझर (स्त्रीलंपट) आहे. पण, जर ते खरं असतं तर माझ्या दुसऱ्या लग्नानंतरही असं काही घडलं असतं ना? सलोनीबरोबरच्या लग्नाला आता २३ वर्ष झाली आहेत, पण या काळात तुम्ही कधी ऐकलं का की, माझं कोणत्या दुसऱ्या महिलेबरोबर नाव जोडलं गेलं? नाही ना? त्यामुळे या सगळ्या केवळ अफवाच होत्या.”
दरम्यान, कुमार सानू यांचं दुसरं लग्न सलोनी भट्टाचार्य यांच्याशी झालं असून त्यांना दोन मुली आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कितीही अफवा पसरवल्या, तरी त्याचा खऱ्या आयुष्यावर काही परिणाम होत नाही.