मलायका अरोराने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केलं होतं. दोघांची पहिली भेट १९९३ मध्ये एका कॉफी ब्रँडच्या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. पाच वर्षे डेट केल्यावर त्यांनी लग्न केलं आणि २००२ साली त्यांचा मुलगा अरहानचा जन्म झाला. १८ वर्षांच्या संसारानंतर २०१६ मध्ये ते वेगळे झाले आणि २०१७ मध्ये त्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला. त्यावेळी अरहान फक्त १५ वर्षांचा होता.
घटस्फोटानंतर सह-पालकत्व हे आव्हानात्मक असल्याचं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने कबूल केलं. घटस्फोटानंतर मलायकावर टीका झाली, तिला दोष देण्यात आला होता, त्याबद्दल ती व्यक्त झाली. “घटस्फोटानंतर सह-पालकत्वात संतुलन शोधणं खूप महत्वाचे आहे. पण आता इतक्या वर्षांनंतर, मला वाटतं की आमच्यात ते संतुलन आलंय. तसेच अरहान मोठा झालाय, तो २२ वर्षांचा आहे. त्याला माहित आहे की त्याला त्याच्या आईशी काय बोलावं आणि त्याच्या वडिलांशी काय बोलावं,” असं मलायका म्हणाली.
आपण आपली भीती मुलांवर लादतो- मलायका अरोरा
घटस्फोटामुळे प्रत्येक मुलांचं आयुष्य बदलत नाही किंवा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत नाही, असं मलायकाला वाटतं. “बऱ्याचदा, नकळतपणे आपण आपली भीती आपल्या मुलांवर लादतो. पण ते करायला नको. मुलांना त्यांचे पालक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे कधीच कळू नये. मी या गोष्टीची खूप काळजी घेते. त्यामुळे माझ्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही गोष्टीचा मी माझ्या मुलावर परिणाम होऊ देणार नाही,” असं मलायका म्हणाली.
घटस्फोट म्हणजे चूक नाही – मलायका
“घटस्फोट कठीण आहे. आयुष्य कसं जगायचं आणि आयुष्यात काय करावं, याबद्दल बरेच लोक आपली मत मांडतात… पण, मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की नाती कधीकधी खूप नाजूक असतात. माझं लग्न कायम टिकावं असं मला वाटत होतं, पण तसं झालं नाही. याचा अर्थ असा नाही की माझा प्रेमावरील विश्वास उडाला आहे. याचा अर्थ असा नाही की मी जे केलं ती एक मोठी चूक आहे. जे घडायचे होते ते घडलं. आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या ज्यामुळे नातं चांगलं होऊ शकेल, पण शेवटी एका टप्प्यावर, आम्हाला समजलं की आता काहीच बदलणार नाही,” असं मलायका म्हणाली.
मलायका व अरबाज यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला, तेव्हा लोक लगेच तिच्या विरोधात बोलू लागले. “लोकांना वाटतं की स्वतःला प्राधान्य देणं चुकीचं आहे. लोक नेहमीच म्हणतात की तू तुझ्या मुलाला प्राधान्य दिलं पाहिजेस, किंवा कुटुंबाला प्राधान्य दिलं पाहिजे, पण स्वतःला प्राधान्य देण्यात काय चुकीचं आहे? एक म्हण आहे की ‘तुम्ही इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे.’ आणि मला वाटतं की त्यावेळी मला आनंदी राहण्याची गरज होती. आधी मी लोकांना आनंदी ठेवत होते, पण मी आनंदी नव्हते. घटस्फोटानंतर बरेच लोक माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले, ‘किती स्वार्थी निर्णय.’ खरं तर तो तुमच्यासाठी स्वार्थी निर्णय असू शकतो. पण मला जे वाटलं ते मी केलं. हे समजणं लोकांसाठी कठीण आहे. पण त्या निर्णयामुळे मला एक चांगली व्यक्ती व्हायला मदत झाली. मी आता जास्त आनंदी आहे. माझा मुलगा आता खूप आनंदी आहे,” असं मलायका म्हणाली.