Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) संन्यास घेतला. तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. पण आज (शुक्रवारी) किन्नर आखाडा व महामंडलेश्वर पदावरून तिची हकालपट्टी करण्यात आली. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीवर कारवाई केली. ममताला महामंडलेश्वर करण्यास आपला आधीपासून विरोध होता, असंही दास यांनी सांगितलं. त्यांनी ममता कुलकर्णीबरोबरच तिला महामंडलेश्वर करणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आखाड्यातून काढलं. या घडामोडीनंतर ममता कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. ममता मुलाखतीही देत असते. तिने महाकुंभमेळ्यातील अनेक व्हिडीओ व फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिचे संन्यास घेतानाचे व महामंडलेश्वर बनण्याचे विधी पूर्ण करतानाचेही फोटो व व्हिडीओ आहेत. ममताने किन्नर आखाड्यातून तिची हकालपट्टी झाल्याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या संपूर्ण प्रकरणानंतर तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

ममता कुलकर्णीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या मुलाखतीचा आहे. ती ‘आप की अदालत’ शोमध्ये उपस्थित राहणार असून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसेल. तसेच तिने भगव्या कपडे, गळ्यात रुद्राक्ष माळ व कपाळावर चंदन लावलेले फोटो पोस्ट केले आहेत.

ममता कुलकर्णी (फोटो – इन्स्टाग्राम)

ममता कुलकर्णीची हकालपट्टी का झाली?

किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला आखाड्यातून काढलं. तसेच देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्यात घेतल्याबद्दल आणि त्यांच्या नकळत तिची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याबद्दल महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ममताला महामंडलेश्वर करण्याच्या निर्णयावर बाबा रामदेव यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. काही लोक एकाच दिवसात संत झाले आणि महामंडलेश्वर पद मिळवले, अशी टीका तिच्यावर झाली. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही ममताला हे पद मिळाल्यावर नाराजी व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamta kulkarni first post after being expelled from kinnar akhara mahamandaleshwar mahakumbh updates hrc