Madalsa Sharma Shares Bad Experience : मनोरंजन क्षेत्रातील कास्टिंग काऊचसारख्या प्रकारांबद्दल आजवर अनेक कलाकार मंडळींनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. आज इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचसारख्या वाईट अनुभवातून जावे लागले आहे. याआधी अभिनेत्री इंडस्ट्रीतल्या या वाईट अनुभवांबद्दल व्यक्त होत नसत, मात्र आता अनेकजणी या कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे आपलं मत व्यक्त करताना दिसतात.
अशातच ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आणि अभिनेत्री मदलसा शर्मानंही तिच्या इंडस्ट्रीतल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं वाईट अनुभव शेअर केला. तसंच साऊथ इंडस्ट्री सोडून बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय का घेतला याबद्दलही सांगितलं.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिनं साऊथ इंडस्ट्रीत मला काही वाईट अनुभव आले, ज्यामुळे त्या इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा आणि बॉलीवूडमध्ये येऊन काम करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं. याबद्दल मदालसा म्हणाली, “साऊथमध्ये मला काही वाईट अनुभव आले होते; जे मी सहन करू शकले नाही. मला असं वाटलं की, हा मार्ग माझ्यासाठी योग्य नाही. त्यामुळे मी साऊथ इंडस्ट्री सोडली.”
मदालसा शर्मा कास्टिंग काउचबद्दल म्हणाली…
यानंतर मदालसाला तिच्याबरोबर कास्टिंग काउचसारखा काही प्रकार घडला होता का? असं विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, तेव्हा ती म्हणाली, “कास्टिंग काऊच आणि अशा काही गोष्टी मला वाटतं सर्वत्र आहेत. पण, साऊथमध्ये मला थोडं जास्त निराशाजनक वाटलं. प्रत्यक्ष वाईट अनुभव आला नाही, पण एक संवाद असा झाला ज्यामुळे मी अस्वस्थ झाले. तेव्हा मी १७ वर्षांची होते. त्या भेटीत मला असं वाटलं की इथून निघून जाणंच योग्य आहे आणि मी थेट मुंबईला परत आले.”
दरम्यान, मदालसा शर्माने हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करण्यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘अनुपमा’ या रूपाली गांगुलीच्या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतीच ती विवेक अग्निहोत्रीच्या ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटातही दिसली.
अभिनेत्री मदालसा शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट
२००९ साली मदालसानं तेलुगू चित्रपट ‘फिटिंग मास्टर’मधून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘शौर्य’, ‘आलस्याम अमृतम’, ‘थंबिकू इंधा ऊरु’, ‘मेम वयासुकु वाचम’, ‘पथयेरम कोडी’ आणि ‘सुपर २’ यांसारख्या अनेक प्रादेशिक चित्रपटांत काम केलं. बॉलीवूडमध्येही तिने काही चित्रपट केले आहेत, ज्यात राजश्री प्रॉडक्शन्सचा ‘सम्राट अँड कंपनी’ हा चित्रपट आहे.
