Mrunal Thakur Apology Post : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ अचानक चर्चेत येईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळे व्हिडीओ ट्रेडिंगला येत असतात. ज्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगताना दिसते. अशातच ‘सन ऑफ सरदार २’ फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनलाय.
मृणाल ठाकूर तिच्या पहिल्या टीव्ही शोसाठी काम करत होती, तेव्हाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावेळी मृणालने बिपाशाच्या शरीराबद्दल कमेंट केली होती. या व्हायरल व्हिडीओत मृणाल स्वतःला बिपाशा बासूपेक्षा चांगली असल्याचे सांगते. हा व्हिडीओ व्हायरल होताच मृणाल सोशल मीडियावर टीकेची धनी बनली आहे. बिपाशाच्या चाहत्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे.
या प्रकरणी आता मृणालने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मृणालने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये ती म्हणते, “१९ वर्षांची असताना, त्यावेळी मी विचार न करता काही गोष्टी बोलून गेले. त्या वेळी मला माझ्या शब्दांचं महत्त्व किंवा विनोदाने म्हटलेली एखादी गोष्ट कोणाला दुखावू शकते, याची कल्पना नव्हती. पण माझे शब्द खरंच एखाद्याला दुखावणारे होते आणि त्याबद्दल मला मनापासून खेद आहे.
यापुढे ती म्हणते, “कोणाच्या शरीरयष्टीबद्दल टीका करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. पण त्या मुलाखतीमध्ये केलेली थट्टा मर्यादेपलीकडे गेली. मला आता समजतंय की, ते शब्द लोकांना कसे वाटले असतील आणि खरंच, मला वेगळे शब्द वापरायला हवे होते.”
यापुढे इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मृणाल म्हणते, “काळाच्या ओघात एक गोष्ट मला समजली आहे, ती म्हणजे सौंदर्य हे वेगवेगळ्या रूपांत असतं आणि आज मी त्या प्रत्येक रूपाचं खरंच कौतुक करते.”
दरम्यान, मृणाल ठाकुरचा व्हिडीओ व्हायरल होताच बिपाशा बासूने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यात तिने “मजबूत महिला एकमेकींना पुढे नेतात. सर्व सुंदर महिलांनी आपल्या स्नायूंना मजबूत करावे. आपण सगळ्यांनी मजबूत व्हायला हवं. स्नायू तुमच्या शरीराला आणि मेंदूला चांगलं बनवतात. महिलांनी मजबूत किंवा शारीरिकदृष्ट्या बलवान नसावं हा जुनाट समज काढून टाका.” असं म्हटलं.