बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज मराठी अभिनेते म्हणजे नाना पाटेकर होय. नाना पाटेकर त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिले. नाना पाटेकरांच्या पत्नीचं नाव निलकांती पाटेकर आहे. नाना व निलकांती यांनी प्रेमविवाह केला होता, पण लग्नानंतर काही वर्षांनी ते वेगळे राहू लागले.

नाना पाटेकरांच्या पत्नी निलकांती मुलगा मल्हार व सासूबाईंबरोबर राहायच्या, तर नाना एकटेच वेगळे राहायचे. नाना यांनी स्वतःच एका मुलाखतीत हा खुलासा केला. नाना पाटेकर यांनी याच मुलाखतीत पत्नीमुळे अभिनयक्षेत्रात करिअर करू शकलो, असं म्हटलं होतं. पत्नीचे खूप उपकार असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.

तुम्ही निलकांती यांना केव्हा भेटला होतात? ‘जात न पुछो साधु की’ या नाटकावेळी का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हो. तेव्हाच भेटलो होतो. ती बँकेत अधिकारी होती, ती नाटकात काम करायची. आम्हाला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि त्यावेळी तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५-२० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरीही १५०० मिळायचे. ती मला म्हणाली, तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. त्यावेळी माहित नव्हतं यशस्वी होऊ की नाही.”

निलकांती पाटेकर यांनी सिनेमे का केले नाहीत?

सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर निलकांती यांनी एका चित्रपटात काम केलं होतं, पण नंतर त्यांनी चित्रपट केले नाहीत. “मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा राहायचो, ते एकत्र राहायचे. आई, मल्हार व निलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच वेगळा राहत होतो,” असं नाना पाटेकर निलकांती यांनी काम का केलं नाही, याबद्दल म्हणाले होते.

नाना पाटेकर व निलकांती यांचे लग्न अवघ्या ७५० रुपयांत झाले होते. इतकंच नाही तर ते पुण्याला हनिमूनसाठीही गेले होते. निलकांती यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं आणि त्यासाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यामुळेच नाना या क्षेत्रात करिअर करू शकले.

निलकांती पाटेकर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्या ‘छावा’मध्ये दिसल्या होत्या. त्यांनी ‘छावा’ सिनेमात धाराऊंची भूमिका केली होती.