ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरुनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याचसंदर्भात नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’च्या ‘सिनेमा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. याच मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘A Wednesday’ चित्रपटाचा एक किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “त्यांना सरकारकडून…” ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ट्रोलर्सबद्दल स्पष्टच बोलले, पंतप्रधानांचाही केला उल्लेख
नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘A wednesday’ हा चित्रपट चांगलाच गाजला. वाढत्या दहशतवादामुळे यंत्रणेवर भडकलेल्या एका सामान्य माणसाने गोष्टी आपल्या हातात घेतल्या तर काय होऊ शकतं हे या चित्रपटातून फार प्रभावीपणे दाखवण्यात आलं होतं. यामध्ये चार दहशतवादी दाखवण्यात आले होते. ते चारची दहशतवादी मुस्लिम असल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शक नीरज पांडेच्या निदर्शनास आणून दिले होते.
याविषयी नाराजी व्यक्त करताना नसीरुद्दीन शाह या मुलाखतीमध्ये म्हणाले, “मी ही गोष्ट नीरजच्या लक्षात आणून दिली होती. या चारही आतंकवाद्यांमध्ये एकही तमिलियन रेबेल, नक्षली किंवा माओवादी नव्हता. चौघेही मुस्लिम होते. मी जेव्हा नीरजला विचारलं की हे जाणून बुजून केलं आहे का? तर त्यावर तो म्हणाला की असं काहीच नाही यात कोणताही राजकीय अॅंगल नाही.”
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.