मनोज बाजपेयींनी खूपदा सांगितलंय की ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अनेक वेळा रिजेक्ट झाले होते, त्यांना तिथे प्रवेश मिळू शकला नव्हता. पण आता त्यांचे वडील राधाकांत बाजपेयीबद्दल माहिती समोर आली आहे, ज्यावरून ते सिनेप्रेमी असल्याचं दिसून येतं. मनोज यांचे दिवंगत वडील राधाकांत बाजपेयी यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) अभिनय अभ्यासक्रमासाठी ऑडिशन दिली होती.

पत्रकार-लेखक पीयूष पांडे यांच्या ‘मनोज बाजपेयी: द डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ या पुस्तकात राधाकांत बायपेयींचा किस्सा सांगितला आहे. राधाकांत यांना चित्रपटांचं वेड होतं आणि त्यामुळे त्यांचे सुपूत्र व हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मनोज यांना सिनेमाबद्दल प्रेम निर्माण झालं असावं, असं पुस्तकात म्हटलं आहे.

“छठ उत्सवासाठी आम्ही घराची साफसफाई करत असताना आम्हाला बाबांच्या वस्तूंमध्ये पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे एक प्रॉस्पेक्टस सापडलं, मनोजनेही ते पाहिलं. मग आमच्या बाबांनी सांगितलं की त्यांच्या कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाने त्यांना पुण्याला सहलीला नेलं होतं, त्यांनी या इन्स्टिटय़ूटबद्दल ऐकलं होतं म्हणून ते कॅम्पसमध्ये गेले, त्यावेळी ऑडिशन्स होत होत्या आणि त्यांनीही अभिनयाच्या कोर्ससाठी ऑडिशन दिली. खास गोष्ट म्हणजे त्यावेळी कॅम्पसमध्ये मनोज कुमार आणि धर्मेंद्र दोघेही उपस्थित होते,” असं मनोज यांची मोठी बहीण कामिनी शुक्लाच्या हवाल्याने पुस्तकात लिहिलं आहे.

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

खरं तर राधाकांत बाजपेयी यांचा चित्रपटांशीच फक्त तेवढाच संबंध नव्हता, महाविद्यालयीन काळात त्यांनी ‘चित्रपट बाबू’ म्हणून अर्धवेळ काम केलं होतं. म्हणजे ते वितरकांकडून चित्रपटाचा रील बॉक्स घेऊन थिएटरमध्ये नेण्याची जबाबदारी पार पाडायचे. “ते रीलचा बॉक्स पाटण्याहून मुझफ्फरपूरला आणायचे,” असं पुस्तकात म्हटलं आहे.

ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”

पुस्तकात मनोज यांनी वडिलांना चित्रपटप्रेमी म्हटलंय. राधाकांत दिलीप कुमार, मोतीलाल आणि देव आनंद या अभिनेत्यांचे मोठे चाहते होते. आपला मुलगा यापैकी कोणत्याही स्टारबरोबर स्क्रीन शेअर करू शकला नाही, याची त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत खंत वाटत होती. “मी फिल्मफेअर वाचायचो आणि अनेक चित्रपट बघायचो. मला दिलीप कुमार, मोतीलाल आणि देव आनंद आवडायचे. मोतीलाल आणि दिलीप कुमार अभिनेते होते, पण देव आनंद हिरो होता. माझ्या मुलाला (मनोज) त्याच्या करिअरमध्ये अभिनेता म्हणून हिरोंपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली,” असं राधाकांत यांनी पुस्तकात सांगितलं आहे.

दरम्यान, मनोज बाजपेयींचे वडील राधाकांत बाजपेयी यांचं ऑक्टोबर २०२१ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालं.