Govinda Bollywood Career : १९९० च्या दशकातील काही लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे गोविंदा. गोविंदा हा सर्वांचाच आवडता कलाकार होता. त्याचं विनोदाचं अचूक टायमिंग आणि हटके डान्समुळे तो प्रेक्षकांचा आवडता बनला होता. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले; पण २००० नंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.

गोविंदाचे अनेक चित्रपट चालेनासे झाले आणि बॉक्स ऑफिसवर त्याला काही यश मिळेना. सलमान खानबरोबरचा ‘पार्टनर’ सिनेमा हिट झाला; पण तरीही त्याला पूर्वीचं यश पुन्हा मिळालं नाही. गोविंदाच्या आजूबाजूचे काही लोकच त्याचं करिअर बिघडवण्याचा प्रयत्न करीत होते, असं विधान प्रसिद्ध निर्मात्यानं केलं आहे.

निर्माते पहलाज निहलानींनी गोविंदाबरोबर अनेक चित्रपट केले आहेत. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, आजूबाजूचे लोक गोविंदाचं करिअर बिघडवण्याचा प्रयत्न करीत होते, असं म्हटलं आहे. ‘पार्टनर’ सिनेमानंतर त्याला नव्या सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या नाहीत. प्रियांका चोप्राबरोबरचा त्याचा एक चित्रपट अचानक रद्द करण्यात आला. असे अनेक प्रोजेक्ट्स त्याच्याकडून गेल्याचं त्यांनी म्हटलं.

त्याबद्दल निहलानी असं म्हणाले, “जेव्हा कुणी पाठीत खंजीर खुपसतो, तेव्हा जखम दिसत नाही आणि बऱ्याच वेळा माणसालाही समजत नाही की, त्याच्याबरोबर धोका झालाय. याचा अर्थ असा की, गोविंदाच्या करिअरमध्ये अनेकदा त्याच्या नकळत त्याची फसवणूक झाली.”

अनेक कलाकारांनी सांगितलं की, गोविंदा कधीच वेळेवर शूटिंगला येत नसे; पण निहलानी मात्र याच्या उलट सांगतात. निहलानी यांनी हेदेखील स्पष्ट केलं की, गोविंदा वेळेवर शूटिंगसाठी येत होता. तो सकाळी ६ वाजतासुद्धा सेटवर यायला तयार असायचा. पण, तरीही काही निर्मात्यांनी त्याच्याबद्दल मुद्दाम नकारात्मक गोष्टी पसरवल्या.”

बॉलीवूडमध्ये खरे मित्र नसतात – पहलाज निहलानी

पुढे निहलानी म्हणाले, “बॉलीवूडमध्ये खरे मित्र नसतात. इथली मैत्री स्वार्थी असते. इथे कोण कुणाचा नसतो.” त्यांनी हेही सांगितलं, “ज्यावेळी एखाद्याचा चित्रपट फ्लॉप होतो, तेव्हा लोक त्यावर पार्टी करतात.”

गोविंदाला सल्ला देणं कठीण – पहलाज निहलानी

त्यानंतर निहलानी म्हणाले, “कुणालाही सल्ला देणं चुकीचं असतं. सत्य सांगणं आणि सत्य ऐकणं – हे दोन्ही खूप वेगवेगळं आहे.” ते पुढे म्हणाले, “गोविंदा एक उत्कृष्ट कलाकार आणि चांगला माणूस आहे; पण कधी कधी त्याच्या विचारांमध्ये चूक होते.”