अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअरच्या सुरुवातीलाच तिला किंग खानबरोबर मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. तिनं आजवर बॉलीवूडमधील अनेक नामांकित कलाकारांसह काम केलं आहे. अनुष्का अनेक हिट चित्रपटांचा भाग राहिली आहे. परंतु, कलाकार म्हटलं की, जोवर ते एखाद्या चित्रपटामध्ये दिसत नाहीत, तोपर्यंत चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल शाश्वती नसते. त्यामुळेच चित्रपटातून अचानक काढून टाकल्यासारख्या अनेक तक्रारी काही कलाकारांकडून आपण ऐकत असतो. असंच काहीसं अनुष्का शर्माबरोबरही झालं होतं.
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अनुष्कानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यापूर्वी ती मॉडलिंग करीत असे; परंतु आदित्य चोप्रा यांनी तिच्यातील कलागुण अचूक हेरले आणि तिला तिच्या करिअरमधील मोठा ब्रेक दिला. तर ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील गाणीसुद्धा त्यावेळी बरीच गाजली होती. या चित्रपटानंतर अनुष्कानं ‘बदमाश कंपनी’ या चित्रपटात काम केलं. आदित्य चोप्रा यांनीच तिला या चित्रपटाची ऑफर दिली. परंतु, ऑफर जरी मिळाली असली तरी अनुष्काला हा चित्रपट सहजासहजी मिळाला नव्हता.
‘बदमाश कंपनी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन व लेखन अभिनेते परमित सेठी यांनी केलं होतं. अभिनयाला वैतागून त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे त्यांनी ‘बदमाश कंपनी’ या चित्रपटाची कथा लिहिली आणि या चित्रपटासाठी त्यांना नायकाच्या भूमिकेत शाहिद कपूरच हवा होता. परंतु, नायिकेबाबत मात्र त्यांनी कोणाचीच निवड केली नव्हती. म्हणून त्यांनी यासाठी आदित्या चोप्राला विचारलं तेव्हा आदित्य चोप्रानं अनुष्काचं नाव सुचवलं. याबाबत त्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. ते म्हणाले, “आदित्य चोप्रानं मला अनुष्काचं नाव सुचवलं होतं. परंतु, मला तिचा चेहरा टिपिकल भारतीय मुलीसारखा वाटला आणि त्यामुळे मी तिच्याबाबत थोडा साशंक होतो.”
पुढे ते म्हणाले, “आदित्य मला म्हणाला, ‘ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तू तिला एकदा भेट’. त्यानंतर जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा तिच्यात काहीतरी वेगळंच असल्याचं मला जाणवलं.” आणि त्यानंतर ‘बदमाश कंपनी’ या चित्रपटातून अनुष्का व शाहिद यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास ५० कोटींचा गल्ला जमवला होता.