Pooja Bedi : परवीन बाबी हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं असं नाव आहे ज्या अभिनेत्रीने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र तिचा अंत दुर्दैवी होता. यातना सहन करतच ती आयुष्य जगली आणि तिचा शेवटही तसाच झाला. अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा बेदीने एका मुलाखतीत परवीन बाबीच्या शेवटच्या दिवसांबाबत खुलासा केला आहे. तसंच तिची शेवटची काही वर्षे चांगली गेली नाहीत असंही पूजाने सांगितलं. परवीन बाबी आणि कबीर बेदी या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्याबाबतही पूजाने भाष्य केलं आहे. सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत पूजा बेदीने परवीन बाबीच्या आयुष्यातील काही प्रसंगांचा उलगडा केला आहे.

काय म्हटलं आहे पूजा बेदीने?

“मला आजही लक्षात आहे परवीन बाबी अनेक वर्षांनी भारतात परतल्या होत्या. त्यावेळी प्रत्येक जण ही चर्चा करु लागला होता की परवीनच्या आयुष्यात काहीतरी घडलं आहे. मी त्यांच्या घरी गेले, त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडला. मला लक्षात आलं की त्यांचं वजन खूप वाढलं आहे आणि त्यांनी केस मोकळे सोडले आहेत पण तेही विस्कटलेल्या अवस्थेत आहेत. मला त्या दिवशी त्यांनी पाहिलं आणि त्या खुश झाल्या. मला म्हणाल्या पूजा हाय. ये आतमध्ये. मग त्यांनी मला मिठी मारली आणि त्यानंतर आम्ही गप्पाही मारल्या. सगळं काही व्यवस्थित होतं. “

परवीन बाबी यांच्याबाबत पूजा बेदीने काय सांगितलं? (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

परवीन बाबी यांचं वागणं अचानक बदललं-पूजा बेदी

पूजा बेदी पुढे म्हणाली, “परवीन आणि मी आमचा काही वेळ चांगला गेला. पण त्या अचानक मला म्हणाल्या पूजा, मला माफ कर मी तुला जेवायला देऊ शकणार नाही. कारण मी फक्त अंडी खाऊनच जगते आहे.” पूजा म्हणाली की मी त्यांना विचारलं की तुम्ही फक्त अंडीच का खात आहात? त्यावर मला परवीन बाबी म्हणाल्या, “अंड्यांमध्ये काहीही त्यांना काहीही भेसळ करता येणार नाही.” मी विचारलं त्यांना म्हणजे कुणाला? तर त्या म्हणाल्या सिक्रेट सर्विस म्हण किंवा FBI. मी ते उत्तर ऐकून चकीत झाले.

मेक अपचं सामान घ्यायलाही घाबरत होत्या परवीन बाबी

पूजा या मुलाखतीत पुढे म्हणाली, मला नंतर परवीन बाबींनी सांगितलं की त्या बाजारातून मेकअपही घेत नाहीत. कारण कुणीतरी तो मेकअप बिघडवून टाकतं. मी त्यांना विचारलं तुम्ही मेक अपचं सामान घ्यायला जात आहात हे कुणालाही कसं कळेल? तर त्या म्हणाल्या तुला माहीत नाही त्यांना सगळं माहीत असतं. मला त्या क्षणी वाटून गेलं की जे काही चाललं आहे ते चांगलं नाही. परवीन बाबी यांची मनस्थिती बिघडली होती. मी त्यांचं बोलणं ऐकून खूप गोंधळून गेले आणि निराशही झाले होते असंही पूजाने या मुलाखतीत सांगितलं.

परवीन बाबी यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. शेवटच्या दिवसांत मात्र त्यांचं मानसिक संतुलन ढळलं होतं. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

कबीर बेदी यांनी परवीन बाबींबाबत काय सांगितलं होतं?

गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत कबीर बेदी यांनीही परवीन बाबी यांच्याबाबत भाष्य केलं होतं. “मी परवीनला कधीही सोडलं नाही. मी तिला माझ्यापासून दूर केलं नाही. तिची भीती तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली. तिची मानसिक अवस्था बिघडली होती, हे तिलाही माहीत होतं. तिला वाटायचं की मी तिची उपाय करण्यासाठी समजूत घालेन आणि तिला माझं ऐकावं लागेल. त्यामुळे तिने मला दूर लोटलं.” परवीन बाबीचे प्रेमसंबंध कबीर बेदी, डॅनी, महेश भट्ट या तिघांशीही होते. पण या पैकी कुणाशीही त्यांनी लग्न केलं नाही. तिला पॅरोनॉईड स्क्रिझोफ्रेनिया झाला होता. २० जानेवारी २००५ ला ऑर्गन फेल्युअर झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी म्हणजेच २२ जानेवारी २००५ ला ही माहिती लोकांना समजली. तिच्या घराबाहेर असलेला पेपर आणि दूध हे २०, २१ आणि २२ जानेवारी असे तीन दिवस तसंच पडलं होतं. तेव्हा इमारतीच्या सेक्रेटरींनी पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर पोलीस आले, त्यांना दरवाजा तोडावा लागला. दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांना परवीन बाबी त्यांच्या बेडवर दोन दिवसांपूर्वी मरुन पडल्या होत्या हे दिसलं. ज्यानंतर परवीन बाबी यांचा मृत्यू झाल्याची माहिती जगासमोर आली.