मराठमोळी राधिका आपटे आपल्या दमदार अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलत नाही. तिने आपलं लग्नही बराच काळ लपवून ठेवलं होतं. राधिका काही महिन्यांपूर्वी आई झाली, आता तिने गरोदरपणात काम करण्याचा अनुभव सांगितला.
राधिकाने नेहा धूपियाच्या ‘फ्रीडम टू फीड’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी राधिकाने प्रेग्नेन्सीची घोषणा केल्यानंतर तिला ज्या शारिरीक व भावनिक आव्हानांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल सांगितलं. तसेच गरोदर महिलांबद्दलचे जुने विचार व भेदभाव याबद्दलही तिने तिचं मत व्यक्त केलं. “त्यावेळी मी ज्या भारतीय निर्मात्यांबरोबर काम करत होते, त्यांना माझ्या गरोदरपणाची बातमी आवडली नाही,” असं वक्तव्य राधिकाने केलं.
घट्ट कपडे घालण्याचा आग्रह
राधिका म्हणाली, “ते माझ्याशी कठोरपणे वागू लागले होते आणि त्यांनी मला घट्ट कपडे घालायला सांगितलं. त्यावेळी मला कंफर्टेबल वाटत नव्हतं. मी माझ्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत होते. मला वारंवार भूक लागत होती. मी भात व पास्ता असे पदार्थ खात होते. शरीरात बरेच बदल होत होते, त्यावेळी मला समजून घेण्याऐवजी मला वाईट वागणूक दिली.”
वेदना होत होत्या, तरीही निर्मात्यांनी डॉक्टरांना भेटू दिलं नव्हतं, असं राधिकाने सांगितलं. “वेदना होत होत्या, अस्वस्थ वाटत होतं तरीही निर्मात्यांनी सेटवर डॉक्टरांना भेटू दिलं नव्हतं,” असं राधिका आपटे म्हणाली.
राधिकाने हॉलीवूड निर्मात्यांचं केलं कौतुक
राधिका त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रकल्पात काम करत होती. तिने हॉलीवूड निर्मात्यांचं कौतुक केलं. “हॉलीवूडच्या निर्मात्यांनी मला खूप सांभाळून घेतलं मी त्यांना म्हटलं होतं की मी खूप खातेय, त्यामुळे शूटिंग संपेपर्यंत माझा लूक बदलू शकतो. त्यावर ते हसत म्हणाले, ‘तू या प्रोजेक्टच्या शेवटपर्यंत पूर्णपणे बदललीस तरी काळजीचं कारण काही नाही. तू गरोदर आहेस, त्यामुळे लूक बदलणं स्वाभाविक आहे.’ त्यांनी अशा रितीने पाठिंबा देणं खूप मोठी गोष्ट होती,” असं राधिका म्हणाली.
व्यावसायिक जबाबदाऱ्या समजतात आणि त्याचा आदर करते, असं राधिका म्हणाली. “त्या वेळी थोडीशी सहानुभूतीही खूप मोठी मदत वाटते. मला कोणाकडूनही विशेष वागणूक मिळावी अशी अपेक्षा नव्हती, मला फक्त थोडी माणुसकी आणि समजूतदारपणा अपेक्षित होता. लोकांनी माझा आनंद थोडा समजून घ्यावा अशी माझी इच्छा होती,” असं राधिकाने नमूद केलं.
राधिका व बेनेडिक्ट टेलर यांची भेट २०११ साली लंडनमध्ये झाली होती. तेव्हा राधिकाने कामातून ब्रेक घेतला होता आणि डान्स शिकायला गेली होती. राधिका व बेनेडिक्ट यांनी २०१३ मध्ये लग्न केलं आणि डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या लेकीचं स्वागत केलं.