दिवंगत स्मिता पाटील व राज बब्बर यांचा मुलगा, बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने नुकतंच त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. प्रतीकने मुंबईत त्याची दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या घरी लग्नगाठ बांधली. या लग्नात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. प्रियाचे कुटुंबीय लग्नात होते, पण प्रतीकने बब्बर कुटुंबातील कुणालाच लग्नाचं निमंत्रण दिलं नव्हतं. त्याने लग्नात न बोलावल्याने सावत्र भाऊ आर्य बब्बरने नाराजी व्यक्त केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतीकने वडील राज बब्बर यांना लग्नाचं निमंत्रण न दिल्याने ते दुखावले आहेत, असं आर्य म्हणाला होता. तर आमच्यासाठी जे महत्त्वाचे व जवळचे लोक आहेत, ते सगळे या लग्नात होते, असं प्रतीकची बायको प्रिया म्हणाली होती. याचदरम्यान, आता आर्यने त्याच्या नवीन स्टँड-अप कॉमेडी ॲक्टमध्ये प्रतीकच्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्यांचे वडील राज बब्बर यांची प्रतिक्रिया काय होती ते सांगितलं.

ताज्या व्हिडीओमध्ये आर्यने प्रतीकला टोले लगावले. तसेच त्याने राज बब्बर यांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं. प्रतीकच्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा राज यांची प्रतिक्रिया काय होती आणि जेव्हा माध्यमं त्यांना त्याच्या लग्नाबद्दल विचारतील तेव्हा ते काय उत्तर देणार, याची माहिती आर्यने दिली.

आर्य बब्बरने वडिलांना काय विचारलं?

आर्या बब्बरने त्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो प्रतीकच्या लग्नाबद्दल आणि राज बब्बर यांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलत आहे. वडिलांबरोबरचा मजेशीर संवाद आठवत तो म्हणाला, “मी म्हणतो पप्पा, जर मीडियावाल्यांनी तुम्हाला विचारलं…जसे आमच्या लहानपणी विचारायचे की तुमच्या वडिलांचे अफेअर आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? तर यावेळी आम्हाला जर विचारलं की तुमच्या भावाचे लग्न आहे आणि तुम्हाला बोलावलं नाही तर याचं उत्तर कसं द्यायचं?”

आर्य वडील राज बब्बर यांची मिमिक्री करत म्हणाला, “माझ्या वडिलांनी याचं थेट उत्तर दिलं. पुरुष लग्न करतच राहतात, असं ते म्हणाले.” आता आर्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एपिसोडचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो भाऊ प्रतीकच्या दुसऱ्या लग्नावर टीका करताना दिसत आहे.

दरम्यान, प्रतीकने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी व्हॅलेंटाईन डेला (१४ फेब्रुवारी) दुसरं लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न सान्या सागरशी झालं होतं. पण दोघांचा घटस्फोट झाला, त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं, त्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj babbar reaction on prateik babbar second marriage with priya banerjee smita patil aarya babbar hrc