Rashmika Mandanna Men’s Periods Remarks : बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाबरोबरच्या नात्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. तसंच तिच्या आगामी सिनेमामुळेसुद्धा तिच्या नावाची चर्चा आहे. अशातच रश्मिका मंदानाने केलेल्या एका वक्तव्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अभिनेत्रीनं एका मुलाखतीत ‘पुरुषांना एकदा तरी मासिक पाळी यावी, यातूनच त्यांना महिलांना दर महिन्याला होणाऱ्या त्रासाची जाणीव होईल’, असं म्हटलं होतं. रश्मिकाच्या या वक्तव्यानंतर तिला पुरुषांप्रती असंवेदनशील असल्याचं म्हटलं गेलं. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर आता रश्मिकाने आपली भूमिका मांडली आहे.

जगपती बाबू यांच्या ‘जयम्मू निश्चयमु रा’मध्ये रश्मिकाला विचारलं की, ‘ती खरंच मानते का की पुरुषांनी पिरियड्स अनुभवावेत.’ त्यावर रश्मिकाने ठामपणे उत्तर दिलं, “हो, मला त्यांना एकदातरी पिरियड्स अनुभवायला हवे. त्यांना त्या वेदना आणि त्रासाचा अनुभव येईल. हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्याला अशा भावना होतात, ज्या आपण समजू शकत नाही आणि आपण त्याचा दबाव पुरुषांवर नाही टाकू शकत, कारण त्यांना कितीही समजावलं तरी ते समजू शकत नाहीत; म्हणून जर पुरुषांना एकदातरी पिरियड्स मिळाले तर त्यांना त्या वेदनेचा अनुभव येईल.”

एका फॅन पेजने रश्मिकाची त्या वक्तव्याची क्लिप शेअर केली, ज्यामध्ये रश्मिकाने मासिक पाळीबद्दल आपलं मत मांडलं आहे. तसंच ट्विटमध्ये लिहिलंय, ‘कधी कधी आपल्याला इतकंच वाटतं की आपल्या वेदना आणि भावना समोरच्याने समजून घ्याव्यात. ही तुलना नाही किंवा पुरुषांच्या जबाबदाऱ्या कमी करण्याबाबत नाही. मात्र, अहंकारातून अशा प्रकारचा विचार केला जात आहे.’

रश्मिकाने आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देत सांगितलं की, “आता याबद्दल कोणी काहीच बोलणार नाही, त्यामुळे एखादा शो किंवा मुलाखतीत जायला मला भीती वाटते; कारण मी काहीतरी वेगळं म्हणते आणि त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढला जातो.”

रश्मिकाने तिच्या वैयक्तिक अनुभवावर विचार मांडत सांगितलं, “माझ्या पिरियड्सच्या वेदनेमुळे मी एकदातर बेशुद्धही झाले आहे. मी अनेक चाचण्या केल्या, डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण कोणीही समजून सांगू शकले नाही की असं का होतं. प्रत्येक महिन्यात मी विचारते, ‘देवा, तू मला इतका त्रास का देतोस?’ मला असं वाटतं की हे फक्त त्यानंतरच समजता येतं, जेव्हा तुम्ही ते स्वत: अनुभवता; म्हणूनच मला वाटतं की पुरुषांनी एकदातरी पिरियड्स अनुभवायला हवे.”

दरम्यान, रश्मिकाच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, रश्मिका नुकतीच ‘द गर्लफ्रेंड’ तेलगू चित्रपटामध्ये दीक्षित शेट्टीबरोबर दिसली. रश्मिका विजय देवरकोंडासोबतच्या अफवांमुळे चर्चेत आहे आणि दोघांचा विवाह फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य आणि बॉलीवूड सिनेमांमधून अभिनेत्रीनं सर्वांचं मनोरंजन केलं आहे.