‘दंगल’ आणि ‘छिछोरे’ या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे नितेश तिवारी पहिल्यांदाच पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘रामायण’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा व बहुप्रतिक्षित, दिग्गजांची मांदियाळी असलेला चित्रपट आहे. नितेश तिवारीच नाही तर ‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट आहे.
रणबीर कपूर, साई पल्लवी व यश यांच्या भूमिका असलेल्या ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना फार आवडला असून त्याबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय. सिनेमात रणबीर प्रभू श्री रामांची भूमिका करतोय. तर त्याच्याबरोबर लोकप्रिय टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. अलिकडेच एका मुलाखतीत रवीने रणबीर कपूरबरोबर काम करण्याबद्दल आणि ‘रामायण’ सिनेमाचा भाग होऊ शकल्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
रणबीर कपूरबद्दल रवी दुबे म्हणाला…
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत रवी दुबेने रणबीर कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. “जेव्हा तुम्ही आयुष्यात असं यश पाहता, तुम्हाला खूप प्रेम मिळतं, त्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने वागण्याचं स्वातंत्र्य मिळतं. बरेच लोक यश व प्रेम मिळाल्यावर तसं वागतात; पण रणबीरची नम्रता, दयाळूपणा, त्याची शांतता, पडद्यामागे काम करताना कामाबद्दलचा त्याचा अॅटिट्यूड अविश्वसनीय आहे,” असं रवी दुबे म्हणाला.
रणबीर कपूर मोठ्या भावासारखा असून त्याचा खूप आदर व सन्मान करत असल्याचं रवीने नमूद केलं.
‘रामायण’मधील कलाकार
‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. तर लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे. कन्नड अभिनेता यश रावण हे पात्र साकारणार आहे. तर हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल झळकणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल राजा दशरथ यांची भूमिका साकारणार आहेत. लारा दत्ता कैकेयी व रकुल प्रीत सिंह शूर्पणखा ही भूमिका करणार आहे.
‘रामायण’ केव्हा रिलीज होणार?
‘रामायण’ चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. यापैकी ‘रामायण भाग १’ २०२६ च्या दिवाळीत रिलीज होईल. ‘रामायण भाग २’ दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होईल. या चित्रपटात अॅडव्हान्स टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. तसेच व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. ‘रामायण’ हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे.