ज्येष्ठ अभिनेत्री रेखा त्यांचे सदाबहार सौंदर्य, दमदार चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. रेखा अनेकदा प्रेमात पडल्या, पण ते प्रेम पूर्णत्वास गेलं नाही. रेखा यांचं महानायक अमिताभ बच्चन यांच्यावरही प्रेम होतं, ते प्रेम अनेकदा त्यांनी व्यक्तही केलं. तसेच विनोद मेहरा व जितेंद्र यांच्याबरोबरही त्यांचं नाव जोडलं गेलं. इतकंच नाही तर रेखा यांनी लग्नही केलं होतं, पण शेवटी त्या एकट्याच राहिल्या.
रेखा यांनी ४ मार्च १९९० रोजी दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवालशी लग्न केलं होतं. आयुष्यात अखेर प्रेम मिळालं, असं रेखा यांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. रेखा व मुकेश यांचं लग्न अरेंज मॅरेज होतं. लग्नाआधी रेखा फक्त एकदाच मुकेश यांना भेटल्या होत्या, याची कबुली त्यांनी स्वतः दिली होती. लग्नानंतर काही आठवड्यांनी रेखा यांना जाणवलं की हे नातं फार काळ टिकू शकणार नाही.
रेखा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की हनीमूनला गेल्यावरच त्यांना समजलं की त्या व मुकेश एकमेकांसाठी आदर्श जोडीदार नाहीत. रेखा यांच्यासाठी हा भावनिक धक्का होता, पण त्यांनी निराश न होता हे नातं निभवायचं ठरवलं.
मुकेश यांची असुरक्षितता व रेखा यांची अट
रेखा कामामुळे पती मुकेश यांना जास्त वेळ देऊ शकत नव्हत्या. शूटिंगमुळे त्यांना बाहेर राहावं लागायचं, हे मुकेश यांना फारसं रुचत नव्हतं. रेखा यांनी अभिनय सोडून गृहिणी व्हावं, घरी राहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी रेखा यांना त्यांची इच्छा बोलून दाखवली होती. यासिर उस्मानच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. पतीच्या या इच्छेबद्दल रेखा म्हणालेल्या, “मी गरोदर राहिले तर मी अभिनय सोडेन.” पतीने आपलं करिअर स्वीकारावं, असं रेखा यांना वाटत होतं, पण तसं झालं नाही.
रेखा यांच्या पतीने केलेली आत्महत्या
मुकेश व रेखा यांच्यात मतभेद होते, त्यामुळे ते वेगळे राहत होते. मुकेश नैराश्यात होते, हे लग्नानंतर रेखा यांना समजलं. लग्नानंतर ७ महिन्यांनी ऑक्टोबर १९९० मध्ये मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती, त्यात कोणालाही दोष देऊ नका, असं लिहिलं होतं.
रेखावर झालेले आरोप
मुकेश अग्रवाल यांच्या आत्महत्येनंतर रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं. रेखा यांच्यावर आरोपही झाले, कामावरही परिणाम झाला होता. मात्र, रेखा या सर्व आव्हानातही खचल्या नाही. त्यांनी परिस्थितीला सामोरं जात पुनरागमन केलं. रेखा यांनी पतीला समजावण्याचा व नातं टिकवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मुकेश यांच्या मानसिक स्थितीमुळे व कम्पॅटिबिलीटी इश्यूमुळे नातं टिकलं नाही.