Riteish Vilasrao Deshmukh : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने रितेश व जिनिलीया यांनी वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. रितेशचं आपल्या वडिलांबरोबर फारच जवळचं नातं होतं. ते सूनबाई जिनिलीयाला सुद्धा आपली मुलगी मानायचे. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रितेश- जिनिलीयाने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
विलासराव देशमुख हे १९९९ ते २००३ आणि २००४ ते २००८ या काळात महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. वडिलांच्या परवानगीनेच राजकारणापेक्षा वेगळं क्षेत्र निवडत रितेशने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपट फ्लॉप झाला किंवा आपला अभिनय आवडला नाही, तर लोक आपल्या मुख्यमंत्री वडिलांना नावं ठेवतील याची भिती सतत त्याच्या मनात होती. यावर विलासरावांनी त्याला एक खास सल्ला दिला होता. “माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे” वडिलांनी दिलेल्या या एका सल्ल्यामुळे रितेश देशमुखचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. पप्पांचा हा सल्ला माझ्या सदैव लक्षात राहील असं अभिनेत्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
रितेशची वडिलांच्या आठवणीत पोस्ट…
रितेश देशमुखला राहिल व रियान अशी दोन मुलं आहेत. हे दोघंही स्मृतिदिनी त्यांच्या आजोबांचे आशीर्वाद घेत असल्याचं अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोला अभिनेत्याने, “आजोबा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे…विलासराव देशमुख स्मृतिदिन” असं कॅप्शन दिलं आहे. तर, अभिनेत्याने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये राहिल-रियान हात जोडून आजोबांना नमस्कार करत असल्याचं पाहायला मिळतंय.
रितेश देशमुखच्या पोस्टवर असंख्य चाहत्यांनी कमेंट्स करत विलासराव देशमुख यांना अभिवादन केलं आहे. “मिस यू साहेब”, “प्रत्येक मराठी माणसाचा आत्मविश्वास होते साहेब…विनम्र अभिवादन”, “साहेबांसारखा नेता होणं नाही”, अशा प्रतिक्रिया रितेशच्या पोस्टवर आल्या आहेत.
दरम्यान, रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याचा बहुचर्चित ‘राज शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: रितेश करत आहे. याशिवाय या सिनेमात दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळेल.