सलमान खानचा ‘दबंग’ प्रदर्शित होऊन १५ वर्षे झाली आहेत. चित्रपटात अरबाज खानची पत्नी मलायका अरोराने ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर आयटम डान्स केला होता. हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अलीकडेच काही खुलासे केले आहेत. या गाण्यात मलायकाला घेण्यासाठी अरबाजची परवानगी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले होते. खान भावंडं ‘कूल’ दिसत असली तरी ते ‘रूढीवादी’ मुस्लीम आहेत, असं कश्यप म्हणाले.
‘दबंग’ प्रदर्शित झाला तेव्हा मलायका अरबाजचा घटस्फोट झाला नव्हता. “मलायकाने हे गाणं करावं, यासाठी अरबाज तयार नव्हता. त्याच्या पत्नीला ‘आयटम गर्ल’ असं लेबल लावलं जाईल हे त्याला आवडणारं नव्हतं. अरबाज आणि सलमान लोकांसमोर ‘कूल’ असल्याचा दिखावा करत असले तरी प्रत्यक्षात ते खूप रूढीवादी मुस्लीम आहेत. सलमानचे मलायकाशी तिच्या ड्रेसवरून मतभेद होते. त्यांच्या घरातील महिलांनी अंगभर कपड्यांमध्ये राहावं असं त्यांना वाटतं. त्यामुळे तिने आयटम साँग करावं असं त्यांना वाटत नव्हतं,” असं स्क्रीनशी बोलताना अभिनव कश्यप म्हणाले.
अरबाजची मनधरणी करावी लागली – कश्यप
“मलायका ही आत्मविश्वासू आणि स्वतंत्र महिला आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते. तिला या गाण्याची ऑफर दिल्यावर तिने लगेच होकार दिला. मात्र, अरबाजची थोडी मनधरणी करावी लागली. मलायकाने अरबाजला सांगितलं की यात काहीच अश्लील नाही, फक्त डान्स आहे, गाण्यात सगळे कुटुंबातील लोकांसारखेच आहेत, मग तुला कसली भीती वाटतेय? आणि मग हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की या गाण्याने अनेक विक्रम मोडले,” असं अभिनव कश्यप म्हणाले.
मलायका उत्तम डान्सर आहे
मलायका अरोराला तिच्या डान्स कौशल्यामुळे ‘मुन्नी बदनाम’ गाण्यात घेतलं होतं, असं अभिनव कश्यपने नमूद केलं. “मलायका छैय्या छैय्या आणि होंठ रसिले या सारख्या गाण्यांसाठी खूप लोकप्रिय होती. तिने जास्त अभिनय केला नाही, पण आम्हाला अशी अभिनेत्री पाहिजे होती जी हे गाणं स्वबळावर हिट करू शकेल. मलायका एक उत्तम डान्सर आहे. कॅमेऱ्यासमोर कमी असणाऱ्या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक जास्त उत्सुक असतात,” असं कश्यप म्हणाले.
सलमानमुळे केले गाण्यात बदल
हे गाणं संपल्यानंतर सलमान खानने आत यावं अशी दिग्दर्शकाची इच्छा होती, परंतु सलमान त्या गाण्यात दिसण्यास उत्सुक होता, ज्यामुळे शेवटी सोनू सूदला बॅकग्राउंडला ठेवण्यात आलं. “गाणं खूप चांगलं झालं. सलमानने ते गाणं ऐकल्यावर सांगितलं की त्यालाही या गाण्याचा भाग व्हायचं आहे. सुरुवातीला तो गाणं संपल्यानंतर लगेच येणार होता, तोपर्यंत सोनू पार्टी करणार असा सीन होता. पोलीस घेराव घालत आहेत आणि खलनायक एंजॉय करतोय. हा हे गाणं वापरण्यासाठी परफेक्ट सीन होता. पण नंतर, सलमानने आग्रह धरला की त्याला या गाण्यात दिसायचंय, त्यामुळे मी त्याला गाणं संपण्यापूर्वी आत घेतलं,” असा खुलासा अभिनव कश्यपने केला.
दरम्यान, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९९८ मध्ये लग्न केले आणि २००२ मध्ये त्यांनी मुलगा अरहान खानचं स्वागत केलं. १८ वर्षांच्या संसारानंतर २०१६ मध्ये ते वेगळे झाले आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.