Sanjay Dutt Wait 9 Hours For Govinda : नव्वदच्या दशकातला लोकप्रिय अभिनेता म्हणजे गोविंदा. आपल्या अभिनयानं आणि हटके डान्स स्टाईलनं त्यानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. मात्र, नंतरच्या काळात त्याचे चित्रपट अपयशी ठरले आणि त्याचं स्टारडम कमी होऊ लागलं. याचदरम्यान, गोविंदाच्या वेळ न पाळण्याबाबतचे अनेक किस्सेदेखील गाजू लागले. त्याच्या अनेक सहकलाकार व निर्मात्यांनी यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.
अशातच अभिनेता रजत बेदीनंसुद्धा गोविंदाच्या वेळ न पाळण्याबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे. ‘जोड़ी नं. १’च्या सेटवर गोविंदामुळे संजय दत्तला जवळपास नऊ तास वाट बघावी लागली होती आणि त्यामुळे संजय दत्त खूपच चिडला होता. शेवटी वाट पाहून संजय दत्तनं दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना तो सीनच बदलायला लावला.
सिद्धार्थ कननबरोबरच्या संभाषणात रजत म्हणाला, “गोविंदानं खूप साऱ्या फिल्म्स स्वीकारल्या होत्या. ‘जोड़ी नं. १’च्या शूटसाठी दिग्दर्शक डेव्हिड धवन सकाळी ७ वाजता शुटिंग सुरू करणार होते. तेव्हा मी आणि संजय दत्त सकाळी ६ वाजताच सेटवर पोहोचलो होतो. संपूर्ण युनिट वेळेवर आलं होतं; पण गोविंदा मात्र काही केल्या दिसत नव्हता. त्यामुळे सगळे जण गोविंदाची वाट पाहत होते. तेव्हा कळलं की, तो अजूनही घरीच आहे. मग सेटवरून एक माणूस त्याला बोलवायला त्याच्या घरी पाठवला गेला.; पण तो माणूस तसाच बाहेर थांबून होता. आठ तास झाले तरी गोविंदा आलाच नाही.”
त्यानंतर रजतनं सांगितलं, “दुपारी २ वाजता संजय दत्त खूपच चिडला होता; पण त्याच वेळी कळलं की, गोविंदा तर घरात नाहीच – तो तर थेट हैदराबादहून फ्लाईटने यायला निघाला आहे. त्या काळात गोविंदा एकाच वेळी ४-५ शिफ्ट्स करीत होता. त्यामुळे तो कुठे आहे हे कोणालाही माहीत नसायचं.” गोविंदा शेवटी दुपारी ३ वाजता सेटवर पोहोचला. त्यावेळी असिस्टंटनं शूटिंगचा सीन संजय दत्तकडे नेला. तो सीन पाहून संजय दत्तला कळलं की, त्याचे संवाद खूप आहेत आणि गोविंदाचे कमी.”
त्याबद्दल रजत बेदी सांगतो, “संजय दत्तनं असिस्टंटला शिवीगाळ केली आणि त्याला सांगितलं, ‘हे डायलॉग्स गोविंदाला दे, आता हे मी नाही करणार’. त्यामुळे अख्खा सीन तिथेच बदलण्यात आला. मात्र, एवढ्या गोंधळानंतरही गोविंदानं तो सीन केवळ दोन तासांत पूर्ण केला.”
पुढे रजत गोविंदाचं कौतुक करीत म्हणाला, “गोविंदा एक चांगला अभिनेता, चांगला परफॉर्मर आहे आणि खूप चांगला माणूसही आहे; पण त्याचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे वेळेवर न येणं.”