Sumeet Raghvan Shares Emotional Video : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शाह यांचं २५ ऑक्टोबर रोजी निधन झालं. ते किडनीच्या आजारामुळे त्रस्त होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘मैं हूँ ना’, ‘जाने भी दो यारो’, ‘मुझसे शादी करोगी’सारख्या चित्रपटांसह अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या सतीश शाह यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

दिवंगत सतीश शाह यांना सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमधून श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार मंडळींनी भावूक पोस्ट शेअर केल्या. तसेच अनेकांनी त्यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशातच आता अभिनेता सुमीत राघवननं एक भावुक व्हिडीओ शेअर करीत सतीश शाह यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सिनेमातील भूमिकांबरोबरच सतीश शाह यांची एक भूमिका प्रचंड गाजली आणि ती म्हणजे ‘साराभाई वर्सेस साराभाई’मधली इंद्रवदन ही भूमिका. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यात सतीश शाह यांच्या मुलाची भूमिका अभिनेता सुमीत राघवननं केली होती. त्यामुळे सतीश शाह यांच्या निधनाबद्दल कळताच अभिनेत्याला अश्रू अनावर झाले. त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करीत सुमीतनं आपल्या दु:खी भावना व्यक्त केल्या.

या व्हिडीओमधून आपलं दु:ख व्यक्त करीत सुमीत असं म्हणतो, “२००४ मध्ये आपण एक शो सुरू केला होता; पण फक्त ७० एपिसोड्सनंतर तो बंद करावा लागला. आज २१ वर्षांनी हा शो लोकांच्या हृदयात घर करून गेला. तो शो म्हणजे ‘साराभाई वर्सेस साराभाई’. साराभाई वर्सेस साराभाई या शोला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. या शोमधील कलाकारांनासुद्धा वेगळी ओळख मिळाली. लोक अनेकदा भेटले की, म्हणतात, ‘मी माझ्या घराचा साहिल आहे’, ‘तो आमच्या घरचा रोशेश आहे’, किंवा ‘माझी पत्नी अगदी मोनिषासारखी वागते’. पण कधीही कोणी सांगितले नाही की, ‘हा आमच्या घराचा इंद्रवदन आहे’. कारण- इंद्रवदन फक्त एकच होता, ते म्हणजे सतीशकाका. ते सतीशकाका आपल्याला सोडून गेले.”

त्यानंतर सुमीतनं शोमधील कलाकारांच्या खास नात्याबद्दल सांगितलं. व्हिडीओमध्ये तो पुढे म्हणाला, “शो जितका मोठा झाला, तितकंच आपलं नातं घट्ट झालं. त्यामुळे जेव्हा आपण भेटायचो, तेव्हा आपण एकमेकांना सुमित, रूपाली किंवा राजेश म्हणत नव्हतो; आपण साहिल, मोनिशा, रोशेश, पापा आणि मम्मी म्हणूनच हाक मारायचो.” पुढे सुमीत अधिक भावूक होत म्हणाला, “आज साराभाई कुटुंबाचा मुख्य माणूस, आपला सर्वांत ज्येष्ठ सदस्य, आपल्याला सोडून गेला. गेला काही काळ तो संघर्ष करीत होता आणि शेवटी तो आपल्याला सोडून गेला.”

सतीश शाह यांच्या आठवणीत सुमीत राघवन भावुक

दरम्यान, सुमीतनं शेअर केलेल्या या व्हिडीओखालीही अनेकांनी त्यांना प्रतिक्रियांमधून श्रद्धांजली वाहिली आहे. “सतीशसर तुमची कायम आठवण येत राहील”, “इंद्रवदन साराभाई सर्वोत्कृष्ट वडील होते”, “सतीश शाह यांच्या निधनानंतर कुटुंबातला प्रिय सदस्य गमावला असल्यासारखं वाटत आहे”, “आपल्या विनोद आणि प्रेमामुळे आमच्या बालपणाला आणि आयुष्याला आनंदी आणि सुंदर बनवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.