कोणत्याही पालकांसाठी आपल्या मुलाला गमावण्याच्या दु:खापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. स्वत:च्या डोळ्यांदेखत मुलगा अचानक आपल्यातून निघून जाणं हे आई-वडिलांसाठी सोसणं फारच अवघड आहे. असाच कठीण प्रसंग ओढावला होता तो एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यावर. या अभिनेत्याच्या मुलाने वयाच्या ११ व्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. हृदयाशी संबंधित आजारपणामुळे अभिनेत्याच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले होते. आपल्या दिवंगत लेकाच्या आठवणीत हा अभिनेता आजही भावुक होतो.

हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता म्हणजे शेखर सुमन. नुकत्याच एका मुलाखतीत शेखर सुमन त्याच्या आयुष्यातील या कठीण काळाविषयी मोकळेपणाने व्यक्त झाला. मुलाच्या आजारपणात एका दिग्दर्शकाने त्याला शूटिंगसाठी बोलावून घेतले होते. ते आठवून अभिनेता आजही भावुक होतो. त्याने सांगितले की, आयुष त्याचा हात धरून जाऊ नको म्हणून सांगत होता. या प्रसंगाने शेखरला हादरवून टाकले होते. ज्यामुळे त्याच्या मनात देवावरील श्रद्धेविषयी तेढ निर्माण झाली आणि त्याने घरातून सर्व मूर्त्या काढून टाकल्या.

कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत शेखरने मुलगा आयुषबरोबरच्या काही क्षणांची आठवण सांगितली. याबद्दल त्याने सांगितले, “आयुषची प्रकृती गंभीर असूनही एका दिग्दर्शकाने मला शूटिंगसाठी बोलावले होते. त्यामुळे मी शूटिंगसाठी निघत असताना आयुषने माझा हात धरला आणि म्हणाला, बाबा, आज जाऊ नका, प्लीज.’ यावर मी मुलाला सांगितले की, मी लवकरच परत येईल.” आयुषच्या दुःखद मृत्यूनंतर शेखर सुमनचा देवावरील विश्वास उडाला. लेकाच्या निधनाच्या दुःखात त्याने घरातील मंदिर बंद केले आणि सर्व मूर्त्या काढून टाकल्या.

याबद्दल शेखर सुमनने सांगितले, “मी आता अशा देवावर विश्वास ठेवू शकत नाही, ज्याने माझे निष्पाप मूल घेऊन मला इतके दुःखी केले. आयुषला इतक्या वेदना होत होत्या की, माझ्या पत्नीनेही त्याच्या वेदना कमी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. पण जे नको व्हायला पाहिजे तेच झालं.” दरम्यान, लेकाच्या निधनाच्या दुःखातून अभिनेता अजूनही सावरलेला नाही. आजही तो त्याच्या दिवंगत लेकाच्या आठवणीत व्याकुळ होतात.

शेखर सुमनचा मोठा मुलगा आयुषला हृदयाचा गंभीर आजार झाला होता. त्याच्या उपचारासाठी ते लंडनलाही गेले होते. मंदिरात जाऊन त्याने देवाकडे प्रार्थना केली. पण तरीही मुलाचं निधन झालं आणि अभिनेत्याचा देवावर असलेला विश्वास उडाला.