Soha Ali Khan on Saif Ali Khan Amrita Singh Divorce : सैफ आणि अमृता यांनी १९९१ मध्ये लग्न केलं होतं, पण २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफ व अमृताला दोन अपत्ये आहेत, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. सैफ व अमृता १३ वर्षे एकत्र होते. जेव्हा सैफ व अमृताने लग्न केलं, तेव्हा त्यांचे कुटुंबीय नाराज होते. पुढे दोघांच्या कुटुंबियांची नाराजी कमी झाली. आता पहिल्यांदाच सोहा अली खान भाऊ सैफ व अमृताच्या घटस्फोटाबद्दल व्यक्त झाली आहे.
सोहाचं अमृताशी खूप चांगलं नातं होतं, त्यामुळे त्यांच्या घटस्फोटानंतर तिला स्वतःला खूप बदलावं लागलं होतं. नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत सोहाला सैफ व अमृता यांच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आलं. “या अशा गोष्टी आहेत ज्यावर तुमचं नियंत्रण नसतं. जेव्हा एखादं लग्न मोडतं, तेव्हा दोन्ही कुटुंबांना बदलावं लागतं आणि परिस्थिती स्वीकारून त्यानुसार जुळवून घ्यावं लागतं. काही काळानंतर, तुम्ही तुमची वेगळी नाती तयार करता, पण हे खूप गुंतागुंतीचं असतं,” असं सोहा खान म्हणाली.
सोहा अली खानने अमृता सिंहबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितलं. “मी अमृताबरोबर त्यांच्याच घरात राहिलेय. त्यांनी माझी खूप काळजी घेतली होती. त्यांनी मला फोटोशूट्ससाठी सोबत नेलं होतं. त्यांनी माझ्यासाठी खूप गोष्टी केल्यात. आम्ही एकत्र स्क्रॅबल खेळायचो,” असं सोहाने नमूद केलं.
बदल, तडजोडी कराव्या लागल्या
घटस्फोटानंतर नाती बदलतात, तेच सैफ व अमृता विभक्त झाल्यावर घडलं. पण ही नाती बदलायला थोडा वेळ लागला, असं साराने नमूद केलं. “जेव्हा त्यांचं नातं संपलं, तेव्हा आम्हाला खूप बदल करावे लागले, बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. सर्वात आधी तर तुम्हाला त्यांना त्यांचं नातं ठरवू द्यावं लागतं, नंतर तुम्हाला त्यात स्वतःचं नातं शोधावं लागतं. आम्हीही तसेच केले. आता सर्व काही ठीक आहे. मुलं मोठी झाली आहेत आणि सर्वांना कंफर्टेबल वाटतं. घटस्फोट झाला तेव्हा सारा ९ वर्षांची होती आणि इब्राहिम ३ वर्षांचा होता,” असं सोहा म्हणाली.
शर्मिला टागोर मुलाच्या घटस्फोटाबद्दल काय म्हणाल्या होत्या?
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सैफची आई शर्मिला टागोर घटस्फोटाबद्दल बोलल्या होत्या. “जेव्हा तुम्ही इतकी वर्षे एकत्र असता आणि तुम्हाला दोन सुंदर मुलं असतात, तेव्हा वेगळं होणं अजिबात सोपं नसतं. त्यावेळी वातावरण चांगलं नव्हते, पण मी प्रयत्न केला. आता सर्व संपलं आहे. तिला (अमृता) शांत होण्यासाठी वेळ हवा होता. त्यांनी त्यांच्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या. तो काळ आमच्यासाठी कठीण होता कारण इब्राहिम फक्त ३ वर्षांचा होता आणि आम्हाला आमची नातवंडं खूप आवडायची. टायगर (मन्सूर अली खान पटौदी) इब्राहिमवर खूप प्रेम करायचे, पण त्यांना त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही,” असं शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या.
सैफने घटस्फोटानंतर काही वर्षांनी अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. या लग्नापासून त्यांना तैमूर व जेह ही दोन मुलं आहेत.