अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने ९०च्या काळात तिच्या अभिनयाने व सौंदर्याने अनेकांची विशेषतः तरुणांची मनं जिंकली होती. आजही तिची क्रेझ कमी झालेली नाही. आजही तिचे सिनेमे प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. अशातच नुकतीच सोनाली बेंद्रे दिग्दर्शिका फराह खानच्या डिजिटल चॅनेलवरील व्हिडीओमध्ये झळकली. यावेळी तिने फराह खानसह संवाद साधताना तिला झालेल्या कर्करोगाबद्दल सांगितलं आहे.

२०१८ साली सोनाली बेंद्रेला कर्करोगाचं निदान झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी ती कर्करोगांच्या चौथ्या स्टेजला होती. परंतु, कर्करोगासारखा आजार झाला आहे हे कळल्यावर तिचा नवरा गोल्डी बहल तिला परदेशात उपचारांसाठी घेऊन गेला. वैद्यकीय उपचारांनी सोनालीच्या तब्येतीत सुधारणा झाली. याबद्दल तिने पूर्वी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. यानंतर आता फराह खानसह संवाद साधताना तिने याबद्दल सांगितलं आहे. फराह खान सोनालीला काही वर्षांपूर्वी, “तू आम्हाला खूप मोठा धक्का दिला होता, मी तेव्हा खूप घाबरले होते, पण सोनाली एवढी निडर मुलगी मी अजून पाहिली नाही. पण, आता तुला पुन्हा आधीसारखं पाहून बरं वाटतंय. तुला आज सगळ्या महिलांना काही सांगायचं असेल याबद्दल तर काय सांगशील,” असं म्हटलं आहे.

सोनालीने यावर “मला बरेच दिवस त्रास होत होता, पण आपण नेहमीच आज वेळ नाहीये नंतर जाऊ असं म्हणत दुर्लक्ष करतो आणि मी डॉक्टरांकडे जात होते, पण मी तेव्हा अजून काळजीपूर्वक याकडे लक्ष द्यायला हवं होतं; कारण तेव्हा डॉक्टरसुद्धा ही औषधं घ्या, होऊन जाईल असं सांगायचे; त्यामुळे कर्करोग आहे हे उशिरा समजलं. कर्करोगातून बाहेर यायचं असेल तर सुरुवातीलाच हलगर्जीपणा न करता काळजी घेणं महत्त्वाचं असतं,” असं ती म्हणाली.

दरम्यान, अभिनेत्री सोनाली बेंद्रेबद्दल बोलायचं झालं तर तिने बॉलीवूडमधील अनेक बड्या कलाकारांबरोबर मोठ्या पडद्यावर काम केलं आहे. सोनालीने १९९४ साली ‘आग’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यामध्ये तिच्यासह अभिनेता गोविंदा मुख्य भूमिकेत होता. यानंतर सोनालीने ‘सरफरोश’, ‘किमत’, ‘अंगारे’, ‘भाई’, ‘जीस देश में गंगा रेहता है’, ‘हम साथ साथ है’, ‘अनाहत’, ‘अगं बाई अरेच्चा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने हिंदीसह, मराठी व दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांतही काम केलं आहे.