South Indian Actress Rambha : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जन्मलेल्या येदी विजयलक्ष्मी या १५ वर्षांच्या मुलीने शाळेच्या नाटकात देवी अम्मनची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की, हा निर्णय तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल.

१९९२ साली दिग्गज मल्याळम दिग्दर्शक हरिहरन यांच्या ‘सरगम’ या चित्रपटातून तिची सिनेमात एन्ट्री झाली. या चित्रपटात तिचं नाव होतं अमृता आणि तिनं साकारलेली भूमिका होती – थंकमणी. विशेष बाब म्हणजे ती मुळात मल्याळी नव्हती आणि तिला मल्याळम भाषाही येत नव्हती. तरी आपल्या अभिनयानं तिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं.

‘सरगम’नंतर ती एका तेलुगू चित्रपटात झळकली, ज्यात तिने ‘रंभा’ नावाची भूमिका साकारली होती. ही भूमिका इतकी गाजली की, पुढे ‘रंभा’ याच नावानं तिला ओळखलं जाऊ लागलं. ‘रंभा’नं पाहता पाहता रजनीकांत, मामुट्टी, थलपती विजय, अजित कुमार, चिरंजीवी, कृष्णा, दग्गुबाती वेंकटेश, नंदमुरी बालकृष्ण, विजयकांत, प्रभू, कार्तिक, जगपती बाबू यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केलं.

सलमान खानबरोबर ‘बंधन’ या चित्रपटातदेखील ती झळकली होती, ज्यात सलमानबरोबरच्या तिच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. ‘बंधन’, ‘घरवाली’, ‘बाहरवाली’, ‘क्योंकि मैं कभी झूठ नहीं बोलता’, ‘बेटी नंबर १’ अशा सिनेमांतून ती आणखीनच प्रसिद्धीझोतात आली.

त्यानंतर २०१० मध्ये कॅनडातील व्यावसायिक इंद्रकुमार पथमनाथन यांच्याशी रंभाचा विवाह झाला आणि ती टोरांटोमध्ये स्थायिक झाली. तिनं चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला. रंभा तिच्या पतीबरोबर Magic Woods या कंपनीमध्ये बिझनेस पार्टनर आहे.

या जोडप्याच्या पाच कंपन्या आहेत. प्रसिद्ध निर्माता कलैपुली एस. थानू यांनी एकदा सांगितलं होतं की, रंभा आणि तिच्या पतीची मिळून अंदाजे एकूण संपत्ती २००० कोटी रुपयांहून अधिक आहे.

दरम्यान, शाळेतील एक साधं नाटक, अभिनयाची आवड आणि मेहनतीच्या जोरावर रंभानं अनेक दिग्गजांबरोबर काम करत बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज ती केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक यशस्वी उद्योजिका, आई आणि अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.