Sunjay Kapoor 30 Thousand Crore Property Dispute: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे विभक्त दिवंगत पती संजय कपूर यांच्या संपत्तीचा संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. करिश्मा आणि संजय कपूर यांची मुलगी समायरा कपूरने दिल्ली उच्च न्यायालयात अशी माहिती दिली की, ती अमेरिकेतील एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे आणि गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या विद्यापीठाची फी भरलेली नाही.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्यासमोर हा दावा करण्यात आला. त्यांनी दिवंगत संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांना भविष्यात अशा प्रकरणांचे न्यायालयाबाहेर निराकरण करावे आणि ते पुन्हा खंडपीठासमोर आणले जाऊ नयेत, असे निर्देश दिले.
करिश्मा कपूरच्या मुलांनी दिवंगत वडील संजय कपूर यांच्या कथित मृत्युपत्राच्या वैधतेला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये सुमारे ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश असल्याचे म्हटले जाते. ही सुनावणी त्याच प्रकरणाचा भाग होती.
करिश्मा कपूरच्या मुलांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी म्हणाले की, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटावेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संजय कपूर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि इतर खर्च उचलत होते. त्यांनी असा दावा केला की, मुलांची मालमत्ता सध्या प्रिया कपूर यांच्या ताब्यात आहे आणि अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या समायराच्या विद्यापीठाची फी गेल्या दोन महिन्यांपासून भरलेली नाही.
प्रिया कपूर यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील राजीव नायर यांनी हा दावा निराधार आणि खोटा असल्याचे सांगत फेटाळून लावला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, प्रिया कपूर यांनी नियमितपणे मुलांचा खर्च भागवत आहेत. याचबरोबर विद्यापीठाची फी सुद्धा आधीच भरली आहे. नायर यांनी यावेळी असेही म्हटले की, माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी हा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे.
काय आहे वाद?
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि दिवंगत संजय कपूर यांची मुले, समायरा कपूर (२०) आणि कियान राज कपूर (१५), यांनी त्यांचे वडील आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेत वाटणी मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलांचा आरोप आहे की, त्यांची सावत्र आई प्रिया कपूर यांनी कथित बनावट मृत्युपत्राच्या आधारे संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
जून २०२५ मध्ये लंडनमध्ये पोलो खेळताना संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर, जुलैमध्ये २१ मार्च २०२५ या तारखेचे एक मृत्युपत्र सापडले, त्यात संपूर्ण संपत्ती प्रिया कपूर यांच्या नावावर असल्याचे नमूद आहे. मुलांचा दावा आहे की हे मृत्युपत्र “संशयास्पद परिस्थितीत तयार केले गेले होते आणि ते खोटे आहे.”
