बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्याकडे अभिनयाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी स्वकर्तृत्वावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, यादरम्यान कलाकारांना नवीन असल्याने काही वेळा अडचणींना सामोरं जावं लागतं. असंच काहीसं एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर झाल्याचं तिने सांगितलं आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर २’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारियाने इंडस्ट्रीत नवीन असताना तिला खूप एकटेपण जाणवायचं, तसेच इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतींची सवय व्हायला तिला वेळ लागला याबाबत सांगितलं आहे. ताराने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा मला इंडस्ट्रीतील लोकांबद्दल फार काही माहिती नव्हती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या.”
तारा पुढे म्हणाली, “चित्रपटसृष्टीत मी नवीन असल्याने काही गोष्टी समजून घेण्यासाठी व त्यांची सवय होण्यासाठी खूप वर्षे जावी लागली. मी या इंडस्ट्रीतील नसल्याने हा प्रवास माझ्यासाठी खूप कठीण आणि एकटेपण जाणवणारा होता, कारण मी कोणाशी चर्चा करू शकेन किंवा कोणाकडून सल्ला घेता येईल असं कोणीच माझ्या ओळखीत नव्हतं.”
तारा पुढे याबाबत असंही म्हणाली की, “जे याच क्षेत्रातले असतात किंवा ज्यांच्या घरातील कोणी या क्षेत्रातील असेल तर त्यांना इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती असते. माझ्या करिअरमध्ये असे खूप प्रसंग आले, जिथे मला कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज होती. जर माझ्याकडे अशी कोणी व्यक्ती असली असती तर मला खूप मदत झाली असती.”
दरम्यान, ताराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यासह तिने ‘मरजावान’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘अपूर्वा’ यांसारख्या चित्रपटांत आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.