Twinkle khanna Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड व बॉलीवूडचे संबंध सर्वश्रूत आहेत. अभिनेत्री मंदाकिनी व दाऊदचे अफेअर होते, असं म्हटलं गेलं होतं. मात्र मंदाकिनीने ते कधीच मान्य केलं नाही. तसेच दाऊदचे ऋषी कपूर, दिलीप कुमार यांच्याशी संबंध होते असं म्हणतात. दाऊदचं चित्रपटांवर खूप प्रेम होतं आणि इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेले अभिनेते, निर्माते त्याच्या संपर्कात होते. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना दाऊदसाठी नाचली होती, अशा चर्चा एकेकाळी झाल्या होत्या. यावर ट्विंकलने काय म्हटलं होतं ते जाणून घेऊयात.

ट्विंकल खन्नाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ साठी लिहिलेल्या कॉलममध्ये याबाबत तिची प्रतिक्रिया लिहिली होती. “मी एका टीव्ही न्यूज चॅनलवर माझ्या नावाचं टिकर पाहिलं, ज्यात लिहिलं होतं की मी दाऊदसाठी डान्स केला होता. अनेक गाण्यांवर मी वेड्यासारखे नाचले होते. पण खरं सांगायचं झाल्यास माझ्या मुलांनाही असं वाटतं की माझा डान्स पाहणं डब्ल्यूडब्ल्यूएफचा सामना पाहण्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे दाऊदने माझ्यापेक्षा चांगल्या डान्सर निवडल्या असत्या, हे वृत्तवाहिन्यांना कळायला हवं होतं, पण काय करणारं… हे फेक न्यूजचं जग आहे,” असं ट्विंकल म्हणाली होती.

फेक न्यूजबद्दल म्हणाली…

“आपण आतापर्यंत फेरफार केलेल्या अनेक खोट्या बातम्या पाहिल्या आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान एक कुस्तीपटू हसतानाचा फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला होता. अगदी त्या फोटोपासून ते करोना विषाणूपर्यंत असंख्य फेक न्यूज आपण पाहिल्या आहेत,” असंही ट्विंकलने म्हटलं होतं.

अक्षय कुमारला देखील पत्नी ट्विंकलने दाऊदच्या पार्टीत डान्स केल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत दाऊद इब्राहिमच्या पार्ट्यांमध्ये ट्विंकलने हजेरी लावल्याच्या बातम्या या फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं. “मला माहित नाही की अशा बातम्या कुठून येतात. या बातम्यांमध्ये तथ्य असते तर माझ्या घरावर आतापर्यंत छापेमारी झाली असती. ही बातमी समोर आल्यानंतर एकही पोलीस हवालदार माझ्या घरी आला नाही. पण या बातमीमुळे मला त्रास झाला,” असं अक्षयने म्हटलं होतं.

दरम्यान, अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांनी २४ वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. दोघांना आरव व नितारा ही दोन अपत्ये आहेत. ट्विंकलने लग्न केल्यावर फिल्म इंडस्ट्री सोडली. ती लेखिका आहे.